लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सिव्हिल लाईन्स येथील ग्रेड -१ हेरिटेज झिरो माईलच्या संदर्भात येत्या १५ दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याचे निर्देश हेरिटेज संवर्धन समितीतर्फे देण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हेरिटेज संवर्धन समितीची बैठक शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहामध्ये झालेल्या बैठकीत हेरिटेज संवर्धन समितीचे सदस्य महानगरपालिका उपायुक्त मिलिंद मेश्राम, स्ट्रक्चरल इंजिनिअर पी.एस.पाटणकर, एल.ए.डी. महाविद्यालयाच्या प्राचार्य उज्ज्वला चक्रदेव, नागपूर वस्तू संग्रहालयाच्या क्यूरेटर जया वाहने, नीरीचे संचालक डॉ.तपन चक्रवर्ती, हेरिटेज संवर्धन समितीचे सदस्य सचिव तथा सहायक संचालक नगररचना हर्षल गेडाम, नागपूर सुधार प्रन्यासच्या अधीक्षक अभियंता लीना उपाध्ये, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही.डी. सरदेशमुख, कार्यकारी अभियंता जनार्धन भानुसे, तहसीलदार नझुल सीमा गजभिये, वास्तुविशारद अर्बन डिझायनर अशोक मोखा आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी कस्तुरचंद पार्कसंदर्भात मेट्रोने यापूर्वी मान्य केलेल्या आराखड्यानुसार तत्काळ कामे पूर्ण करावी, अशा सूचना यावेळी दिल्यात.
ठळक मुद्दे
झिरो माईल व कस्तुरचंद पार्क या दोन्ही हेरिटेजचे संवर्धन व संरक्षणासाठी लागणारा खर्च हा हेरिटेज निधीमधून होईल.
हा संपूर्ण खर्च नागपूर महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यास करतील.
मनपा आणि नासुप्रद्वारे हेरिटेजचा निधी कुठे व किती खर्च झाला, याचा अहवालसुद्धा १५ दिवसात सादर करावा लागणार.
उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे झिरो माईलचे सौंदर्यीकरण, संवर्धन करण्यासाठी किती जागा उपलब्ध आहे, याचीसुद्धा माहिती उपलब्ध करण्याचे निर्देश समितीने दिले.