सुभाष घई : रोटरी क्लब आॅफ नागपूर ईशान्यचा सत्कार समारंभ नागपूर : अमेरिकेप्रमाणेच भारतीय विद्यार्थ्यांनाही कौशल्यावर आधारित शिक्षण देणे आवश्यक आहे. यामुळे मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. विद्यार्थ्यांना नृत्य, नाट्य, काव्य, गीत, संगीत, चित्र, खेळ यातील कुठलाही एक विषय अनिवार्यतेने शिकवायला हवा. यातून मुले भारतीय कला आणि संस्कृतीला समजून घेऊ शकतील आणि आपली संस्कृती जोपासण्यासाठी समर्थ होतील, असे मत बॉलिवूडचे शो मॅन, चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई यांनी व्यक्त केले.रोटरी क्लब आॅफ नागपूर ईशान्यच्यावतीने आयटी पार्क, परसोडी स्थित पर्सिस्टंट सिस्टीम्स लिमिटेडच्या कवी कुलगुरु कालिदास सभागृहात धनराजजी आचार्य मेमोरियल बिझनेस लीडरशीप समिटमध्ये सुभाष घई यांचा सत्कार शनिवारी करण्यात आला. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. याप्रसंगी रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रीक्ट ३०३०३ चे गव्हर्नर दत्तात्रय देशमुख यांच्या हस्ते त्यांना ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी घई म्हणाले, पालकांनीही आपल्या इच्छा मुलांवर न लादता त्यांना आवडणाऱ्या क्षेत्रात त्यांचे भविष्य घडविण्याची संधी दिली पाहिजे. माझा जन्म नागपुरात झाल्याने या शहराशी भावनात्मक जुळलो आहे. स्वच्छ नागपूर एक स्मार्ट सिटी व्हावे. आता मुख्यमंत्री या शहरातीलच असल्याने नागपूर स्मार्ट सिटी होण्याची आशा बळावली आहे, असे घई म्हणाले. घई यांनी रोटरी क्लब आॅफ नागपूर ईशान्यद्वारा करण्यात येणाऱ्या सामाजिक कार्याची प्रशंसा क ेली. बॉलिवूडमध्ये झालेला त्यांचा प्रवासही त्यांनी यावेळी उलगडून दाखविला. नवोदित कलावंतांसाठी त्यांनी ‘व्हीसलिंग वूड्स इंटरनॅशनल’ ही संस्था उभारली पण त्यात येणाऱ्या कायदेशीर समस्यांचाही त्यांनी उहापोह केला. ही संस्था माझ्या आयुष्याचे योगदान असून ती संस्था चालविण्यासाठी नव्या शासनाकडून अनेक आशा असल्याचे मत त्यांनी मांडले. या कार्यक्रमाला लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनीही सदिच्छा भेट दिली. कार्यक्रमात दत्तात्रय देशमुख यांनी नोकरी सोडून उद्योग क्षेत्रात भविष्य घडविताना आलेल्या समस्या सांगितल्या. उपलब्ध संसाधन आणि अर्थ साहाय्यतेच्या भरवशावर उद्योग क्षेत्रात युवकांनी यश मिळवावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविकात रोटरी क्लब आॅफ ईशान्यचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर आनंद मोहता यांनी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून क्लबच्या उपक्रमांची माहिती दिली. संचालन प्रोजेक्ट डायरेक्टर नरेश जखोटिया यांनी केले. याप्रसंगी रोटरी क्लब आॅफ नागपूर ईशान्यचे सचिव महेश लाहोटी, असिस्टंट गव्हर्नर ललित लोया, मदनमोहन आचार्य, प्रशांत आचार्य, प्रमोद आचार्य, प्रमोद आचार्य, पर्सिस्टंट सिस्टीम्सचे चीफ पीपल आॅफिसर समीर बेंद्रे, विजय खानोरकर, अंकुश, कमल टावरी, आदित्य अनघा सोसायटीचे चेअरपर्सन अनघा समीर सराफ, संजय मोहता आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कौशल्याधारित शिक्षणप्रणाली आवश्यक
By admin | Updated: February 8, 2015 01:15 IST