लाेकमत न्यूज नेटवर्क
मांढळ : काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, शासनाने लाॅकडाऊन जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर मांढळ (ता. कुही) ग्रामपंचायत येथे मंगळवारी (दि.६) झालेल्या सभेत मांढळमध्ये कडक निर्बंधासह बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. काेराेनावर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले.
मांढळ ग्रामपंचायत येथे सहायक खंडविकास अधिकारी प्रेमानंद कुंभारे, विस्तार अधिकारी सुनील ढेंगे, उपसरपंच सुखदेव जिभकाटे, ग्रामविकास अधिकारी विजय बांते, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच व्यापारी, दुकानदार आदींच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली. या सभेत सविस्तर चर्चा केल्यानंतर मांढळ येथे १३ एप्रिलपर्यंत कडक निर्बंधासह बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. यात सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत किराणा दुकान, फळ व दूध, वृत्तपत्र वितरण सुरू राहील तसेच सायंकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत भाजीपाला, मांस व मच्छी विक्री सुरू राहतील, याशिवाय काेणतेही दुकान सुरू दिसल्यास ५,००० रुपये दंड आकारून कारवाई करण्यात येईल. तसेच लग्न कार्यक्रमात वधू व वराकडील प्रत्येकी २५ व्यक्तींची उपस्थिती राहील. अधिक व्यक्ती आढळल्यास वर व वधू पक्षाकडून २०,००० रुपये दंड आकारला जाईल. लग्नकार्यात छाेटा मंडप टाकावा, डिजे लावू नये, स्थानिक मजुरांनी मांढळमध्येच शेतीकामाला जावे आदी निर्णय घेण्यात आले. ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी काेविड लस घ्यावी, मास्कचा वापर, शारीरिक अंतर पाळावे, अन्यथा ५०० रु.दंड वसूल केला जाईल. सर्दी, खाेकला, ताप ही लक्षणे दिसल्यास काेविड तपासणी करावी, विनाकारण कुणीही फिरू नये तसेच अंत्यविधीसाठी फक्त २० व्यक्ती हजर राहतील, अधिक व्यक्ती आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले.