लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीचा मार्ग बुधवारी मोकळा झाला. या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावल्या.सिनेट सदस्य भीमराव वाघमारे व प्रवीण रघुवंशी यांनी या याचिका दाखल केल्या होत्या. प्राथमिक मुद्दे लक्षात घेता न्यायालयाने निवडणुकीवर स्थगिती दिली होती. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात आली होती. अंतिम सुनावणीनंतर न्यायालयाने याचिका खारीज केल्यामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी हा निर्णय दिला. ११ आॅगस्ट २०१८ रोजी झालेल्या सिनेट सभेत व्यवस्थापन परिषदेतील खुल्या व आरक्षित प्रवर्गाच्या आठ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली. तत्पूर्वी २१ जुलै रोजी सभेच्या विषयपत्रिकेसोबत सिनेट सदस्यांची मतदार यादी जाहीर करण्यात आली होती. कायद्यानुसार ही यादी सभेच्या ४५ दिवस आधी जाहीर करायला हवी होती. तसेच, त्यावर आक्षेप नोंदविण्यासाठी आवश्यक मुदत द्यायला पाहिजे होती. परंतु, या तरतुदींचे पालन झाले नाही असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. विद्यापीठाने स्वत:ची बाजू स्पष्ट करताना सभागृहात होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर करणे, त्यावर आक्षेप मागवणे व त्या आक्षेपांवर सुनावणी घेणे गरजेचे नसल्याचे स्पष्ट केले. विद्यापीठातर्फे अॅड. जेमिनी कासट यांनी कामकाज पाहिले.
अमरावती विद्यापीठ व्यवस्थापन परिषद निवडणुकीचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 21:47 IST
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीचा मार्ग बुधवारी मोकळा झाला. या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावल्या.
अमरावती विद्यापीठ व्यवस्थापन परिषद निवडणुकीचा मार्ग मोकळा
ठळक मुद्देहायकोर्टाचा निर्णय : विरोधातील दोन्ही याचिका फेटाळल्या