लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपात्कालीन स्थितीत अपघाताची सूचना मिळताच तातडीने धावणाऱ्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची चाके १२ आॅक्टोबरपासून थांबणार आहेत. या सेवेची जबाबदारी सांभाळणारी खासगी संस्था बी. व्ही. जी. इंडिया लिमिटेडच्या विरुद्ध रुग्णवाहिकेच्या डॉक्टर, चालक आणि कर्मचाऱ्यांनी संपाची घोषणा केली आहे. कंपनीने मनमानी करीत नियम धाब्यावर बसवून कर्मचाऱ्यांना वेठीस धरल्याचा आरोप महाराष्ट्र माथाडी श्रमिक कामगार संघर्ष युनियनचे प्रदेश सचिव अमोलसिंह परमार यांनी पत्रकार परिषदेत केला.परमार म्हणाले, संपात नागपुरातील १५० डॉक्टर, १९३ चालक आणि कर्मचारी सामील होणार आहेत. महाराष्ट्र शासनाने १ मार्च २०१४ पासून सामान्य नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा सुरू केली. या सेवेच्या संचालनासाठी शासनाने नियमानुसार बी. व्ही. जी. इंडिया लिमिटेडसोबत करार केला. महाराष्ट्रात एकूण ९३७ रुग्णवाहिका आहेत. यात ३५०० डॉक्टर आणि २४०० कर्मचारी नियमित काम करतात. करारानुसार सेवेतील डॉक्टर आणि पायलट कर्मचाऱ्यांना नियमानुसार लाभ देण्याचे ठरले होते. परंतु कंपनीने डॉक्टर, चालक आणि कर्मचाऱ्यांना कोणताच लाभ दिला नाही. वेतनही नियमानुसार देण्यात येत नाही. यामुळे संपाची घोषणा करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी अनेकदा शासनासमोर मागण्या करूनही दुर्लक्ष करण्यात येत आहे. मागील चार वर्षात कर्मचाऱ्यांना पीएफ लागू करण्यात आले नाही. ८ तासांऐवजी १२ तास ड्युटी करवून घेऊन ओव्हरटाईम देण्यात येत नाही. रुग्णवाहिकेचे कार्यक्षेत्र ५० किलोमीटरचे असताना १५० ते २०० किलोमीटर पाठविण्यात येते. रुग्णवाहिकेच्या मेन्टेनन्सकडे लक्ष पुरविण्यात येत नसल्यामुळे अपघाताची भीती राहते. कर्मचाऱ्यांकडून हमालासारखे काम करून घेण्यात येत असून विरोध दर्शविल्यास कामावरून काढण्याची धमकी देण्यात येत असल्याचे परमार यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला नरुद्दीन कुरेशी, किशोर गुरव, पंकज विश्वकर्मा उपस्थित होते.आरोग्य सेवा कोलमडणारमिळालेल्या माहितीनुसार नागपुरात १०८ क्रमांकाच्या एकूण ४० रुग्णवाहिका आहेत. एक रुग्णवाहिका दररोज दोन पाळीत काम करते. एक रुग्णवाहिका रोज जवळपास ४ ते ५ रुग्णांना रुग्णालयात पोहोचविते. यात अपघातासोबतच प्रसुतीचे रुग्ण अधिक असतात. रुग्णवाहिका बंद पडल्यास आरोग्य सेवा कोलमडण्याची शंका वर्तविण्यात येत आहे.
१०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची चाके थांबणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 23:16 IST
आपात्कालीन स्थितीत अपघाताची सूचना मिळताच तातडीने धावणाऱ्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची चाके १२ आॅक्टोबरपासून थांबणार आहेत. या सेवेची जबाबदारी सांभाळणारी खासगी संस्था बी. व्ही. जी. इंडिया लिमिटेडच्या विरुद्ध रुग्णवाहिकेच्या डॉक्टर, चालक आणि कर्मचाऱ्यांनी संपाची घोषणा केली आहे. कंपनीने मनमानी करीत नियम धाब्यावर बसवून कर्मचाऱ्यांना वेठीस धरल्याचा आरोप महाराष्ट्र माथाडी श्रमिक कामगार संघर्ष युनियनचे प्रदेश सचिव अमोलसिंह परमार यांनी पत्रकार परिषदेत केला.
१०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची चाके थांबणार
ठळक मुद्देचालक, कर्मचारी अन् डॉक्टरांचा आजपासून बेमुदत संप