मनपाच्या दहा वर्षांपासून नुसत्या घोषणा : बिकट आर्थिक स्थितीचाही फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरातील ऑरेंज सिटी स्ट्रीट हा महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प. या प्रकल्पात सुमारे साडेपाच हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे शहराचा कायापालट होईल. विकासाला गती मिळेल, असा दावा मनपातील पदाधिकाऱ्यांकडून वेळोवेळी करण्यात आला; परंतु मागील दहा वर्षांपासून हा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ थंडबस्त्यात आहे.
५.५. किलोमीटर लांबीच्या सुमारे ३८ हेक्टर परिसरात प्रस्तावित या प्रकल्पाचे भिजत घोंगडे मागील आठ-दहा वर्षांपासून सुरू आहे. आधी बीओटी तत्त्वावर हा प्रकल्प उभारला जाणार होता. त्यानंतर मनपानेच स्वत: हा प्रकल्प उभारण्याचे ठरविले. त्यानुसार आराखडा तयार करून, या संपूर्ण प्रकल्पाच्या जागेचे ७ झोनमध्ये प्रत्येकी २ लाख चौरस मीटर असे २१ भूखंड पाडले होते. या भूखंडात हा प्रकल्प साकारण्यात येणार होता. पहिल्या टप्प्यात यातील भूखंड क्रमांक ११ वर मेडिकल हब, तर मेट्रोच्या जयप्रकाशनगर स्टेशनजवळ मेट्रो मॉल उभारण्यात येणार होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने हा प्रकल्प उभारण्याचे नियोजन होते. मात्र, महापालिकेची बिकट आर्थिक स्थिती विचारात घेता दोन वर्षांपूर्वी मेट्रो कॉर्पोरेशन लिमिटेडकडे या प्रकल्पाची जबाबदारी सोपविण्यात आली होती; परंतु मेट्रो प्रशासनाने कामाला सुरुवात केली; पण
यात तत्परता न दर्शविल्याने मनपा प्रशासनाने पुन्हा स्वत: हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम मधुकोन कंपनीकडे देण्यात आले; परंतु मागील दोन वर्षांपासून हे काम अर्धवट आहे. यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
....
गरिबांपासून श्रीमंतांसाठी सुविधांचे स्वप्न कागदावरच
‘ऑरेंज सिटी स्ट्रीट’मध्ये गरिबांच्या घरकुलापासून इतर उत्पन्न गटासाठी संकुल, मॉल्स, हॉस्पिटल्स, क्लिनिक, ऑडोटोरियम, क्लब हाऊस, स्विमिंग पूल, मल्टीपरपज हॉल, शाळा, महाविद्यालय, स्पोर्ट क्लब, कन्व्हेंशन सेंटर, मार्केट, पार्किंग सुविधा राहतील. ‘बांधा-वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर विकासकांच्या माध्यमातून हा प्रकल्प साकारला जाईल. तीन टप्प्यांत एकूण एक लाख कोटीहून अधिक चौरस फुटांचे बांधकाम होणार आहे. गरिबांपासून श्रीमंतांसाठी सुविधा उपलब्ध होणार आहेत; परंतु तूर्त हे स्वप्न कागदावरच आहे.
....
लवकरच निविदा प्रक्रिया
महापालिकेचा ऑरेंज सिटी स्ट्रीट हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प बीओटी तत्त्वावर उभारला जाणार आहे. तूर्त या प्रकल्पाचे काम थंड बस्त्यात असले तरी प्रकल्पाच्या निविदा काढण्याची प्रक्रिया लवकरच राबविली जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून मनपाच्या उत्पन्नात वाढ होईल. विकासाला गती मिळणार आहे.
अजय पोहेकर कार्यकारी अभियंता, मनपा