नागपूर : अंबाझरी पोलीस ठाण्याच्या आवारात जितेंद्र चव्हाण नावाच्या एका बिल्डरला पिस्तुलाचा धाक दाखवून धनादेशाच्या स्वरूपात ६५ लाखांची खंडणी वसूल करण्याचा आरोप असलेल्या कुख्यात संतोष आंबेकर याला गुरुवारी उच्च न्यायालयाचे न्या. एम. एल. तहलियानी यांच्या एकलपीठाने जामीन मंजूर केला. एक आठवड्यापूर्वी आंबेकरला अनिवासी भारतीय पराग रामचंद्र गोंधळेकर यांची श्रद्धानंदपेठ येथील कोट्यवधीची मालमत्ता बळकावल्याप्रकरणी उच्च न्यायालयानेच जामीन मंजूर केला होता. त्यामुळे तो एक-दोन दिवसात तब्बल पाच महिन्यानंतर कारागृहाच्या बाहेर येईल. बिल्डरकडून खंडणी वसुलीचे प्रकरण असे की, खामला भागातील आदिवासी सोसायटी शास्त्री ले-आऊट येथे राहणारे जितेंद्र अयोध्याप्रसाद चव्हाण यांनी रविकांत खुशाल बोपचे यांच्याशी भागीदारी करून २२ फेब्रुवारी २०१३ रोजी राहुल बाबूराव वासनिक याचा अंबाझरी ले-आऊटमधील ३ हजार चौरस फुटाचा भूखंड ६५ लाखात विकत घेतला होता. राहुल वासनिकपासून वेगळी राहत असलेली त्याची पत्नी पूनम हिला तब्बल सहा महिन्यानंतर या सौद्याबाबत समजताच ती संजय फातोडे आणि गौतम भटकर नावाच्या दोन गुंडांना घेऊन चव्हाण यांच्या कार्यालयात गेली होती. तिने झालेल्या सौद्यापोटी चव्हाण यांना पैसे मागताच त्यांनी तिला तिच्या पतीकडूनच कायदेशीर मार्गाने पैसे घेण्याचा सल्ला दिला होता. बिल्डरकडून ही रक्कम काढण्यासाठी तिने आपल्या गुंड साथीदारांमार्फत कुख्यात संतोष आंबेकरची मदत घेतली होती. आंबेकरने या बिल्डरला चक्क आपल्या इतवारी येथील कार्यालयात बोलावून धमकी दिली होती आणि पूनमच्या नावे ६५ लाखांचा चेक देण्यास फर्मावले होते. पैसे दिल्यानंतरच माझ्याकडून पूनम वासनिकच्या ताब्यात असलेल्या घराच्या तळमजल्याची चावी घेऊन जाशील, अन्यथा तू प्रॉपर्टी विसरून जा, अशी धमकीही आंबेकरने दिली होती. दरम्यान, १४ डिसेंबर २०१३ रोजी राहुल वासनिक याने तळमजल्याचा ताबा बिल्डर चव्हाण यांना दिल्याचे समजताच सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी चव्हाण यांना अंबाझरी पोलीस ठाण्यात बोलावले होते. त्याच वेळी संतोष आंबेकर हा युवराज माथनकर आणि आकाश बोरकर यांच्यासोबत अंबाझरी पोलीस ठाण्यात गेला होता. त्याने चव्हाण आणि राहुलला शिवीगाळ करीत पूनमच्या नावे ६५ लाखांचा चेक लिहून देण्याबाबत पुन्हा धमकी दिली होती. चव्हाण यांनी ही रक्कम आधीच राहुलला दिल्याचे सांगताच आंबेकरने चव्हाण आणि राहुल यांना मारहाण केली होती. आपल्या कंबरेत खोचलेले पिस्तूल चव्हाण यांना दाखवून त्यांच्याकडून पूनम वासनिकच्या नावाचा ३० लाखांचा आणि अन्य दुसरा ३५ लाखांचा कोरा चेक लिहून घेतला होता. त्यांनतर बिल्डर चव्हाण यांच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी १६ जानेवारी २०१४ रोजी संतोष आंबेकर, पूनम वासनिक आणि अन्य साथीदारांविरुद्ध भादंविच्या कलम ३४२, ३८६, ३८७, ३४ तसेच हत्यार कायद्याच्या कलम ३/२५ नुसार गुन्हे दाखल केले होते. आंबेकर याने सत्र न्यायालयाकडून जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दिवाणी स्वरूपाचे प्रकरण, सहायक पोलीस निरीक्षक कदम यांचा अनावश्यक हस्तक्षेप, एक महिन्याच्या विलंबाने तक्रार आदी निष्कर्ष आपल्या आदेशात नमूद करून न्यायालयाने आंबेकर याला जामीन मंजूर केला. न्यायालयात आरोपीच्या वतीने अॅड. आर. के. तिवारी तर सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील राशी देशपांडे यांनी काम पाहिले.(प्रतिनिधी)
बिल्डरकडून खंडणी वसुलीच्या प्रकरणातही आंबेकरला जामीन
By admin | Updated: June 27, 2014 00:33 IST