लोकमत विशेष....
नागपूर : अंबाझरी तलावातून पावसाळ्यात बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे पूरस्थिती निर्माण होऊ नये तसेच तलाव फुटून दुर्घटना होऊ नये यासाठी या धरणारे बळकटीकरण करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. सोबतच सौंदर्यीकरणही केले जाणार आहे. संबंधित काम चार टप्प्यात होणार असून या कामांसाठी १९.३९ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या अंदाजपत्रकाला जानेवारी २०२१ मध्ये महापालिकेच्या स्थायी समितीने प्रशसकीय मान्यता प्रदान केली आहे.
अंबाझरी तलावाच्या पायथ्याशी मेट्रो रेल्वेने एकूण १४ पिलर्स उभे केले असून त्यांची एकूण लांबी २४० मीटर आहे. त्या अनुषंगाने अंबाझरी तलावाचे बळकटीकरण करून पावसाळ्यात तलावात येणाऱ्या येव्यापासून व तलाव पूर्ण भरल्यानंतर सांडव्यावरून निघणाऱ्या पाण्यापासून भविष्यात जीवित हानी होऊ नये व लोकांचे संरक्षण व्हावे म्हणून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सन २०१७ मध्ये जनहित याचिका (पी.आय.एल. नं. ९६/२०१७) दाखल झाली. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांनी ६ एप्रिल २०१८ रोजी अंबाझरी धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मोक्का तपासणी करून अहवाल सादर केला. ७ एप्रिल २०१८ रोजी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. तीत नागपूर महापालिका, महामेट्रो, जलसंपदा विभाग, धरण सुरक्षा संघटना, नाशिक यांचे अधिकारी, अभियंता उपस्थित होते. या बैठकीत धरणाच्या दुरुस्तीच्या कामात तज्ज्ञ असल्यामुळे जलसंपदा विभागाकडे दुरुस्तीचे काम सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला.
बेळगावच्या इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजीने या तलावाच्या सांडव्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा पूर अभ्यास करून कृती आराखडा तयार करून दिला. मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना, नाशिक यांनी संकल्प व रेखाचित्राला ६ महिन्यात मूल्यार्पण.............. करून दिले. या संकल्पाला मुख्य अभियंत्यांनी मंजुरी दिली व त्यानुसार याचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले.
------------------------
असा आहे अंबाझरी तलाव
- अंबाझरी तलाव १५० वर्षे जुना आहे.
- सध्या नागपूर महापालिकेकडे याची मालकी आहे.
- हा तलाव १८७० मध्ये राजे बिबाजी भोसले यांनी नागपूर लोकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी बांधला होता.
- अंबाझरी तलावाच्या सांडव्यातून नागनदीचा उगम होतो.
------------------------
असे आहेत चार टप्पे
टप्पा १ : दगडी धरणाची दुरुस्ती
- अंबाझरी धरणाच्या स्लीप चॅनेलच्या उजव्या बाजूस आरसीसी रिटेनिंग वॉलचे बांधकाम : १.८३ कोटी
- धरणाच्या सांडव्याच्या खालील बाजूस ऊर्जाव्यव रचनेचे काम व कट ऑफ वॉलचे बांधकाम : १ कोटी
टप्पा २ : माती धरणाची दुरुस्ती
- धरणाच्या पातळीच्या खालील बाजूस टोड्रोनचे बांधकाम : ०.८४ कोटी
- धरणाच्या ऊर्ध्व बाजूस खराब झालेल्या पिचिंगची दुरुस्ती व निम्न बाजूस पिचिंगचे बांधकाम तसेच धरण पातळीचे छेद दुरुस्तीचे काम व बळकटीकरण : ४.४१ कोटी
टप्पा ३ :
- पुलाचे व रोडचे बांधकाम : ७.५५ कोटी
टप्पा ४ :
- धरण सौंदर्यीकरण
- धरणाच्या पातळीच्या दोन्ही बाजूस कर्बवॉल देऊन रेलिंग लावण्याचे काम : २.८७ कोटी
- सांडव्याच्या खालील व वरील बाजूस पर्यटक गॅलरीचे बांधकाम : ०.६४ कोटी
- धरणाच्या मुख्य विमोचकाला बंद करण्याचे काम : ०.२५ कोटी