नागपूर : बुधवारी दुपारी अंबाझरीच्या जंगलाला आग लागली. यात १०० हेक्टर जंगल जळाले. वाळलेले गवत आणि वाऱ्यामुळे ही आग पसरली. तब्बल साडेसहा तास बचावकार्य राबवून सायंकाळनंतर ही आग आटोक्यात आली.
दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास जंगलाला आग लागल्याचे निदर्शनास आले. यानंतर तातडीने आगप्रतिबंधक विभागाला पाचारण करण्यात आले. परंतु वाळलेले ८ ते १० फूट उंचीचे गवत आणि वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आग वेगात पसरली. यात १०० हेक्टर जंगल जळाल्याची माहिती उपवनसंरक्षक प्रभूनाथ शुक्ल यांनी दिली आहे. युनिव्हर्सिटी कॅम्पसच्या मागील भागाला ही आग लागल्याची माहिती आहे. ती पसरत अंबाझरीच्या जंगलापर्यंत पोहोचली. या परिसरात गवत मोठ्या प्रमाणावर असल्याने आग वेगात पसरली. या आगीत कोणत्याही वन्यजीवाची हानी झाली नाही; परंतु पक्षी व तृणभक्षी प्राण्यांच्या अधिवासावर गंडांतर आले आहे.
अंबाझरी जैवविविधता उद्यानाच्या भाग क्रमांक दोनमध्ये ही आग लागली. अलीकडेच फायर लाइनचे काम झाले होते. परंतु फायर लाइन ओलांडून आग पुढे पसरल्याचे शुक्ल यांनी सांगितले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नागपूर महानगरपालिका, वाडी नगरपालिका आणि एमआयडीसीच्या १० बंबांना पाचारण करण्यात आले होते. अथक परिश्रमानंतर सायंकाळी ६.३० वाजेनंतर ही आग आटोक्यात आली. घटनास्थळाला मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) कल्याणकुमार, एसीएफ सुरेंदम काळे यांनी भेट देऊन पहाणी केली.
सुमारे ७५० हेक्टर परिसरातील या संरक्षित जंगलाचे व्यवस्थापन संयुक्त वनव्यवस्थापन समितीकडे देण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी तयार झालेल्या या जैवविविधता उद्यानामुळे शहरालगत निसर्गभ्रमणाची संधी नागपूरकरांना उपलब्ध झाली आहे. इतर आवश्यक सुविधांसह सायकल राइड आणि ई-वाहनातून सफारीचीही सुविधा या उद्यानात आहे. छायाचित्रण आणि पक्षीनिरीक्षणासाठीही अनेक निसर्गप्रेमी या उद्यानात येतात. मात्र, या आगीच्या घटनेने पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
...
दीड तासांच्या विलंबामुळे पसरली आग
युनिव्हर्सिटी कॅम्पसकडून मागील बाजूने ही आग लागली. ही पसरत पुढे सरकली. आग लागल्याचे लक्षात आल्यावर अग्निशमन दलाच्या बंबाला पाचारण करण्यात आले. परंतु तो बंब विद्यापीठाच्या मागील भागात पोहोचला. तिथे आग विझविण्याचे काम सुरू असतानाच इकडे अंबाझरीत आग पसरली. या दीड तासांच्या काळात अंबाझरीत बंब पोहोचण्यास विलंब झाला, परिणामी आग मोठ्या प्रमाणावर वाढली, असे शुक्ल यांनी सांगितले.
...