लाेकमत न्यूज नेटवर्क
जलालखेडा : राज्यभरातील ३०० शाळा ‘आदर्श शाळा’ (माॅडेल स्कूल) म्हणून विकसित करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. यात नरखेड तालुक्यातील अंबाडा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची आदर्श शाळा म्हणून नुकतीच निवड झाली आहे. यात तालुक्यातील प्रत्येकी एक याप्रमाणे जिल्ह्यातील १३ शाळांचा समावेश आहे.
नरखेड तालुक्याच्या शेवटच्या टाेकावर आणि वर्धा नदीच्या तीरावर वसलेले अंबाडा गाव. सन १९९१ मध्ये वर्धा नदीच्या पुराचा फटका बसल्याने अंबाडा गावाचे पुनर्वसन करण्यात आले. पुनर्वसनस्थळी जि.प. शाळेची निर्मिती करण्यात आली हाेती. या शाळेत उपलब्ध असलेल्या भाैतिक सुविधा व शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारावर ही निवड झाली आहे. ग्रामीण भागातील मुलांना चांगले उच्च शिक्षण मिळावे म्हणून शासनाने पायलट प्राेजेक्टचे धाेरण आखले आहे. यात शाळेमधील भाैतिक सुविधेत स्वतंत्र शाैचालय, सुस्थितीत असलेले वर्ग, आकर्षक इमारत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, क्रीडांगण, क्रीडा साहित्य, विज्ञान शाळा, ग्रंथालय आदी बाबींचा समावेश करण्यात आला असून, शैक्षणिक गुणवत्तेमध्ये विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी उत्तम शैक्षणिक पाेषक वातावरण, व्यवस्थितरीत्या लिहिता-वाचता येणे, वाचन, लेखन व गणितीय क्रिया, भाषा व गणितस्तरावरील मूलभूत संकल्पना, पुस्तकांची उपलब्धता, या बाबींचा समावेश आहे. नवनिर्मितीला चालना देणारे समीक्षणात्मक विचार, वैज्ञानिक प्रवृत्ती, संविधानात्मक मूल्ये, साेबत काम करण्याचे काैशल्य तसेच संभाषण काैशल्य अशा अनेक बाबींच्या आधारावर ही शाळा आदर्श शाळा हाेणार आहे.
विद्यार्थ्यांना शारीरिक, बाैद्धिक व मानसिक विकास हाेणे, हे शाळेचे मुख्य वैशिष्ट्य असेल. अध्ययन, सध्याच्या स्पर्धात्मक युगात विविध आव्हानांना सामाेरे जाण्यासाठी त्यांच्यात नेतृत्वगुण, सर्वांगीण विकास करण्यासाठी, विविध विषयात प्राधान्य मिळवून देणारी, विभिन्न क्षेत्रातील काैशल्ये विकसित करणारी ही आदर्श शाळा असेल. एकूणच राज्यभरातील प्रत्येक तालुक्यातून एक शाळा माॅडेल स्कूल म्हणून विकसित करण्यात येणार असून, या शाळा अन्य शाळांना प्रेरणा व मार्गदर्शन करण्याचे काम करणार आहे. अंबाडा गावातील जि.प. शाळेची आदर्श शाळा म्हणून निवड झाल्याबद्दल मला अंबाडाच्या शाळेतील शिक्षकांचा अभिमान वाटताे, अशा शब्दात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच जि.प. सदस्य सलील देशमुख, माजी जि.प. उपाध्यक्ष बंडूपंत उमरकर, पं.स. सभापती नीलिमा रेवतकर, अतुल पेठे, सुधीर खडसे, नीलेश ढोरे यांनी अंबाडा शाळेची आदर्श शाळा म्हणून निवड झाल्याबद्दल शिक्षकांचे व गावकऱ्यांचे अभिनंदन केले.
......
नरखेड तालुक्यातून एकमेव पायलट प्राेजेक्ट म्हणून अंबाडा शाळेची निवड गुणवत्तेच्या आधारावर करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील मुलांचे उज्ज्वल भविष्य व्हावे व त्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेप्रमाणे शिक्षण मिळावे, हाच शासनाचा प्रयत्न आहे. शासनाचा हा प्रयाेग काैतुकास्पद आहे.
- मयूर उमरकर, सदस्य, पंचायत समिती, नरखेड.
....
अंबाडा येथील शाळेची नरखेड तालुक्यातून एकमेव आदर्श शाळा म्हणून निवड झाली आहे. जिल्ह्याच्या सीमावर्ती व वर्धा नदीच्या तीरावर वसलेल्या अंबाडा गावामुळे आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील मुलांना या प्रोजेक्टमुळे उच्च व उत्तम शिक्षणाची सोय होईल.
- शशिकला तट्टे, सरपंच, ग्रामपंचायत अंबाडा.