अजनी वाचवा
नागपूर : अजनीत हाेणाऱ्या इंटरमाॅडेल स्टेशनसाठी हजाराे झाडे तुटणार आहेत. एवढेच नाही तर हजाराे मुलांचे आयुष्य घडविणाऱ्या ८७ वर्षे जुन्या रेल्वे मेन्स शाळेचे अस्तित्वही धाेक्यात येणार आहे. त्यामुळे शाळेच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. बालपणीचे रम्य दिवस ज्या शाळेत काढले ती शाळाच आठवणीतून पुसून जाईल, ही गाेष्ट त्यांना हैराण करीत आहे. त्यामुळे अजनी वाचवा माेहिमेत सहभागी हाेण्यासाठी हे सर्व एकवटले आहेत. नुकतेच शाळेत झालेल्या पाेस्टकार्ड आंदाेलनात सहभागी हाेण्यासाठी अगदी ६० च्या दशकातील जुन्या बॅचचेही विद्यार्थी सामील झाले. साेशल मीडियावरील त्यांच्या बॅचच्या ग्रुपवर लाेकमतच्या बातम्या शेअर करून इतरांनाही आंदाेलनात सहभाग घेऊन प्रकल्पाला विराेध करण्याचे आवाहन केले जात आहे. माेहिमेला सहकार्य करण्यासाठी या प्रत्येकांनी लाेकमतचे आभार मानले आहे.
महेश भुस्कुटे (१९६७ बॅच)
आम्ही रेल्वे काॅलनीत राहायचाे. आम्ही सर्व भावंड पहिली ते दहावीपर्यंत येथे शिकलाे. या शाळेने लाेकांच्या पिढ्या घडविल्या आहेत. माेठमाेठ्या पदावर गेली आहेत. अशा आमच्या शाळेचे अस्तित्व संकटात असल्याचे पाहून वेदना हाेतात. प्रकल्पासाठी पर्यायी व्यवस्था शाेधली जाऊ शकते.
माेहन बाबरेकर (१९८९ बॅच)
सरकारचे हे पाऊल विघातकच म्हणावे लागेल. एक तर हजाराे झाडे कापली जाणे हेच पर्यावरणासाठी धाेक्याचे संकेत आहेत. दुसरीकडे आमच्या बालपणीच्या आठवणी ज्या शाळेत गेल्या, ती शाळाच ताेडली जाणार आहे. हा आमच्या सुवर्ण आठवणींचा चुराडाच आहे. आम्ही सर्वांना एकत्रित करू आणि हा वनराईचा वारसा वाचविण्याचा प्रयत्न करू.
ज्याेती चटपल्लीवार (१९९३ बॅच)
ही इतकी जुनी शाळा आहे. एकप्रकारचा वारसाच आहे. ताे टिकवण्याऐवजी ताेडला जात आहे. या शाळेशी आमच्या अनेक आठवणी जुळल्या आहेत. शाळा वाचविण्यासाठी आमची पूर्ण बॅच उभी राहील.
रेणुका उपाध्ये (१९९३ बॅच)
लाेकमतमध्ये आंदाेलनाबाबत बातमी वाचली आणि आम्ही सहभागी हाेण्यासाठी आलाे. आमचे त्यावेळचे अनेक सहकारी अजनी वाचविण्याच्या माेहिमेत सहभागी हाेण्यासाठी तयार आहेत. आमच्या व्हाॅट्सॲप ग्रुपवर याचीच चर्चा आहे.
अनिकेत कुत्तरमारे (२००९ बॅच)
पहिली ते दहावीपर्यंत याच शाळेत शिक्षण झाले. आमच्यासारख्या अभावग्रस्त विद्यार्थ्यांसाठी ही शाळा शिक्षणाचा आधार आहे. त्यामुळे शाळेचे आणि या परिसरातील हजाराे झाडांचे अस्तित्व वाचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत राहू. प्रशासन ऐकणार नसेल तर आम्हीही वाकणार नाही. आंदाेलन करीत राहू.
महेश बाेडे व प्रियंका बाेडे (जागृत नागरिक)
आम्ही चिंचभुवनला राहताे. पर्यावरणाबद्दल आस्था असल्याने अजनी वाचवा माेहिमेशी जुळण्यासाठी आम्ही तयार आहाेत. महेश बाेडे म्हणाले, अजनी वनाबाबत लाेकमतमध्ये येणारी प्रत्येक बातमी वाचत आणि आमच्या साेशल ग्रुपवर शेअर करीत असताे. हजाराे झाडांची कत्तल करणे ही विघातक प्रवृत्ती आहे आणि त्याविराेधात नागपूरकरांनी उभे राहणे नितांत गरजेचे आहे.