लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : ३० एप्रिलपर्यंत चालणाऱ्या लाॅकडाऊनच्या निर्णयाचा भिवापूर तालुका व्यापारी संघटनेने विरोध केला असून, हा निर्णय मागे घ्यावा. शिवाय, १२ एप्रिलपासून सर्व व्यापारी प्रतिष्ठाने सुरू करण्यात यावी, अशी मागणी व्यापारी संघटनेने केली आहे. याबाबतचे निवेदन संघटनेच्या शिष्टमंडळाने तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांना दिले आहे. या मागणीबाबत विचार न झाल्यास आम्ही आपली दुकाने उघडू, असा इशाराही व्यापारी संघाने दिला आहे.
अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवेच्या नावाखाली शहरातील ७० टक्के दुकाने सुरू आहेत. खरेदीच्या नावावर प्रत्येक दुकानात ग्राहकांची गर्दी असते. त्यामुळे अशा दुकानातून कोरोनाचा संसर्ग होत नाही का, असा प्रश्न व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे. उर्वरित ३० टक्के दुकाने मात्र लाॅकडाऊनच्या नियमावलीनुसार बंद आहेत. दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांसह व दुकानात काम करणाऱ्या नाेकरवर्गाच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. व्यापारी व दुकानदारांची आर्थिक कोंडी लक्षात घेता, लॉकडाऊनच्या नावावर बंद असलेली सर्व दुकाने पूर्ववत सुरू करण्यात यावी. संसर्गजन्य स्थितीत शासनाने ठरवून दिलेल्या फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनिटायझरचा वापर या नियमांचे पालन करण्यास व्यापारी कटीबद्ध असेल, असेही निवेदनात म्हटले आहे.
१२ एप्रिलपर्यंत शासनाने लॉकडाऊनचा निर्णय मागे न घेतल्यास त्यानंतर व्यापारी स्वत:च आपली दुकाने उघडतील, असा इशाराही निवेदनातून दिला आहे. निवेदन देताना शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष अनिल समर्थ, शंकर गुप्ता, मनोहर बोरकर, सोनू गुप्ता, सुप्रीत रेहपाडे, किशोर कुरुटकर, बालू शुद्धलवार, आशिष महाकाळकर, नंदू हटवार, मनीष गुप्ता, मनोज जयस्वाल, अभय विश्वेकर, संतोष सोनकुसरे आदी उपस्थित हाेते.