लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मिशन पुढे नेण्याच्या उद्देशानेच समता प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक कामे झाली; परंतु हे मिशन बदनाम करण्यासाठी ‘कॅग’चा अहवालही दडवून ठेवण्यात आला. खुद्द मंत्र्यांचीही दिशाभूल केली गेली. नागपूर मुख्यालय असलेले समता प्रतिष्ठान बंद पाडण्यासाठीच हा सर्व खटाटोप केला जात आहे, असा दावा माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी येथे केला.
रविभवन येथे त्यांनी प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले की, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या सारख्या महापुरुषांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी या प्रतिष्ठानची निर्मिती करण्यात आली. महार रेजिमेंटचा सत्कार, मूकनायक पुरस्कार, जागर संविधानाचा, बुद्ध धम्माबाबतसारखे विविध कार्यक्रम राबविण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षण घेण्यासाठी आवश्यक मदत करणारे उपक्रम राबविण्यात आले. विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी प्रबोधनकार, कलावंताची नियुक्ती करण्यात आली; परंतु काही झारीतील शुक्राचार्य हे प्रतिष्ठानच बंद करण्याचे षडयंत्र रचत आहेत. समतासाठी ६० कोटी व २० पदे मंजूर करून घेतले होते; परंतु त्यावर कुणीच काम केले नाही. उलट बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. प्रतिष्ठानवर जो ठपका ठेवण्यात आला, होती चुकीचा आहे.
समता प्रतिष्ठानबाबत विधानसभेत देण्यात आलेली माहिती चुकीची आहे. स्टट्युटरी ऑडिटच्या आधारेच कॅगकडून तपासणी करण्यात आली असून त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा ठपका ठेवण्यात आला नाही. उपयोगिता प्रमाणपत्र उशिरा मिळत असते. त्यामुळे ते न मिळणे हा काही भ्रष्टाचार नाही. गैरव्यवहाराबाबत चौकशी सुरू करण्यात आली. त्याचा अहवाल येण्यापूर्वीच घोटाळा झाल्याचे म्हणणे योग्य नाही, असेही ते म्हणाले.