नागपूर : मिहान-एसईझेडमध्ये अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) स्थापन करण्याच्या हालचालीला वेग आला आहे. सध्या ‘एम्स’ करिता ९३ एकर डिनोटिफाईड जागा राखीव ठेवण्यात आली असून उर्वरित १०७ एकर जागेसाठी मंगळवार, ५ मे रोजी मुंबईत सचिव स्तरावर बैठक होणार आहे. विशेष आर्थिक क्षेत्राबाहेर (एसईझेड) दहेगावलगत गोल्फ क्लब येथे ‘एम्स’ला २०० एकर जागा देण्यात येणार आहे. यापूर्वी यालगतची २०० एकर जागा अखिल भारतीय व्यवस्थापन संस्थेला (आयआयएम) देण्यात आली आहे. यंदा आयआयएमचे शैक्षणिक सत्र व्हीएनआयटीमध्ये सुरू होणार आहे. ‘एम्स’ स्थापनेला वेग४‘एम्स’ला हव्या असलेल्या २०० एकर जागेसाठी आॅगस्ट २०१४ मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बोलणी केली होती. पण त्यानंतर हालचाली थंडावल्या होत्या. पण आता या कार्याला वेग आला असला तरीही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून अद्यापही जागेसाठी विचारणा झालेली नाही. पण यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. राष्ट्रीय स्तरावरील संस्थांना प्राधान्याने जागा देण्याचे धोरण आहे. त्याअंतर्गत ही ५ मे रोजी मुंबईत बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बैठकीत जागेसंदर्भात विस्तृत चर्चा होऊन त्याचा अहवाल महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) बोर्डासमोर चर्चेला येईल. त्यानंतर बोर्डाच्या बैठकीचा अहवाल केंद्रात वाणिज्य मंत्रालयासमोर पाठविला जाणार आहे. मिहान-एसईझेडमध्ये ‘एम्स’ला हव्या असलेल्या २०० एकर जागेपैकी १०७ एकर जागेच्या डिनोटिफिकेशनवर लवकरच शिक्कामोर्तब होईल. विकास आयुक्तांची ८ मे रोजी बैठक४विकास आयुक्तांची नियमित होणारी बैठक यावेळी ८ मे रोजी नागपुरात होणार आहे. विकास आयुक्त एनपीएस मुंगा यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत मिहान-एसईझेडमध्ये नवीन कंपन्यांच्या जागेसाठी चर्चा होऊन त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मार्कसन फार्मा या कंपनीला १० एकर आणि इंदमार एमआरओला साडेतीन एकर जागा देण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. इंदमार एमआरओला हवी असलेली जागा बोर्इंग एमआरओच्या मागे आहे. एमएडीसीने उभारलेल्या टॅक्सी वेचा उपयोग या एमआरओला करता येईल. सध्या एसईझेडमध्ये १५०० एकर जागा रिक्त आहे. नवीन कंपन्यांचा अभाव आहे. त्यामुळेच एमएडीसीने लहान कंपन्यांना लक्ष्य केले आहे. फार्मा आणि आयटी कंपन्या स्वत:हूनच जागेसाठी संपर्क साधत आहेत. पुढील काही महिन्यात नव्या कंपन्या मिहानमध्ये उद्योग उभारतील, असे सूत्रांनी सांगितले.
‘एम्स’च्या जागेवर लवकरच शिक्कामोर्तब
By admin | Updated: May 5, 2015 02:02 IST