बदली प्रस्ताव धूळखात : शेकडो अधिकारी, कर्मचारी सहा महिन्यांपासून घरीनागपूर : ज्या मंत्रालयातर्फे सात दिवसांत फाईल्सचा निपटारा करण्याचे आदेश जारी होतात, त्याच मंत्रालयात मात्र कृषी विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदली प्रस्तावाच्या फाईल्स मागील सहा महिन्यांपासून तुंबून पडल्या असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांच्या या आडमुठेपणामुळे कृषी विभागातील शेकडो अधिकारी/कर्मचारी अडचणीत सापडले आहेत. माहिती सूत्रानुसार मागील ३१ मे २०१५ रोजी महाराष्ट्र राज्य कृषी सेवा वर्ग- २ (कनिष्ठ राजपत्रित) व महाराष्ट्र राज्य कृषी सेवा वर्ग-२ (राजपत्रित) संवर्गासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बदली आदेश जारी झाले होते. परंतु यापैकी काही अधिकारी/कर्मचाऱ्यांना नवीन पदस्थापनेवर रुजू होणे शक्य झाले नाही, अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अंशत: फेरबदलासह पुन्हा शासनाकडे बदली प्रस्ताव पाठविले. शिवाय बदलीस पात्र नसतांना ज्यांना बदली हवी आहेत, अशाही काही लोकांनी आपले विनंती अर्ज शासनाकडे सादर केले. परंतु शासनस्तरावर मागील सहा महिन्यांपासून या सर्व प्रस्तावांवर कोणताही निर्णय घेण्यात आला नसून, सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची फरफट सुरू आहे. माहिती सूत्रानुसार शेकडो अधिकारी/कर्मचारी नवीन आदेशाच्या प्रतिक्षेत घरी बसले आहेत. या विलंबाचा संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागत आहे. जाणकारांच्या मते, मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांचा हा उद्योगच झाला आहे. यात फार मोठे अर्थकारण अडकले असून, बदल्यांच्या नावाखाली अधिकारी/कर्मचाऱ्यांना अनावश्यक वेठीस धरले जात असल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुद्धा परिवार आहेत. त्यांच्यावर मुलाबाळांची जाबाबदारी आहे. मात्र असे असताना मागील सहा महिन्यांपासून सर्व अधिकारी व कर्मचारी विना वेतनाने घरी बसून आहेत. एक अधिकारी नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर म्हणाला, सर्वत्र गणपती उत्सव, दुर्गा उत्सव, दसरा व दिवाळी साजरी केली जात असताना आमच्या घरी मात्र अंधकारमय वातावरणात होते. सहा महिन्यांपासून वेतनच नसल्याने कोणताही दसरा किंवा दिवाळी साजरी करू शकलो नाही. (प्रतिनिधी)
कृषी अधिकाऱ्यांची बदल्यांसाठी फरफट!
By admin | Updated: December 5, 2015 09:10 IST