रामटेक : पिकांवर येणारे विविध प्रकारचे रोग आणि किडींमुळे शेतकरी त्रस्त आहेत. या किडी आणि रोगांचा सामना करण्यासाठी कृषी विद्यापीठाच्यावतीने शेतकऱ्यांना विविध उपायोजना करण्यास सांगितले जाते. मात्र, या सर्व अपयशी ठरत असल्याने आता कृषी विद्यापीठाच्या संशोधन आणि उपाययोजनांचे ऑडिट करण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी करणारे निवेदन भाजपच्या ग्राम विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला सादर केले.
खरीप हंगामात तुडतुड्या रोगामुळे धान पिकाला मोठा फटका बसला. अनेक वर्षांपासून गुलाबी बोंडअळीमुळे कापसाचे अर्ध्यापेक्षा अधिक उत्पादन नष्ट होते. सोयाबीन, तूर आणि फळबागांवर येणारे विविध कीड, रोग वेळेत नियंत्रित करण्यात कृषी विभागाचे संशोधन अपयशी ठरत आहे. त्यामुळे या विविध रोगांवर कृषी विद्यापीठाचे आजवरचे संशोधन आणि उपायोजना किती परिणामकारक ठरल्या. यासंदर्भात कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाने संयुक्त अहवाल सादर करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात डॉ. प्रमोद भड, सागर सायरे, दिवाकर भोयर, राहुल नाखले, मयूर माटे आदींचा समावेश होता.