नरेश डोंगरे ल्ल नागपूरदेशभरात खळबळ उडवून देणारे ‘जेल ब्रेक’ प्रकरण खतरनाक गुन्हेगार बिसेनसिंग उईकेच्या बायको-मुलाच्या विरहातून घडल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, ज्यांच्या विरहामुळे अस्वस्थ झालेला बिसेन कारागृह फोडून पळून गेला. त्या बायको-मुलाचा तब्बल १३ महिने शोध घेऊनही ते त्याला सापडले नाही. पोलिसांनी मात्र बिसेनला शोधून काढले. आता तो पुन्हा कारागृहात डांबला जाईल. एखाद्या सिनेमाची स्क्रीप्ट शोभावी अशी ही माहिती बिसेनच्या अटकेनंतर पुढे आली. खतरनाक राजा गौस टोळीचा सदस्य असलेल्या बिसेनला पोलिसांनी मोक्काच्या आरोपात कारागृहात डांबले होते. त्यावेळी त्याची पत्नी गर्भवती होती. काही दिवसातच पत्नीने एका मुलाला जन्म दिला. ही गोड बातमी कळल्यानंतर बिसेनने पत्नीला भेटायला येण्यासाठी कारागृहातून अनेक निरोप पाठविले. मात्र, प्रकृतीच्या कारणामुळे ती येऊ शकली नाही. तब्बल चार महिन्यानंतर ती बिसेनला भेटायला आली. चिमुकल्याला पाहून बिसेन कमालीचा हळवा झाला. कधी एकदा कारागृहाबाहेर पडतो आणि बायको-मुलाजवळ जातो, असे त्याला झाले होते. मुलाला घेऊन भेटीसाठी यावे म्हणून तो पत्नीला वारंवार निरोप पाठवत होता. परंतु त्याला प्रतिसादच मिळत नव्हता. त्यामुळे बिसेन कासावीस झाला असतानाच महिना-दोन महिन्यानंतर एक नातेवाईक त्याला भेटायला आला. ‘तुझ्या पत्नी आणि मुलाला विकण्यात आले‘, अशी बातमी त्याने बिसेनला दिली. ती ऐकून बिसेन वेडापिसा झाला. कारागृहाच्या बरॅकीत तो अक्षरश: आक्रोश करू लागला. सुरू झाला कट ‘अपने साथी के औरत और बच्चे को किसीने भगाकर बेचा है. उसके साथ अपनी भी इज्जत का सवाल है‘, असे म्हणत सत्येंद्र गुप्ताने शिबू खान, प्रेम नेपाली तसेच आकाश ठाकूरला कारागृहातून पळून जाण्याच्या कटात सहभागी करून घेतले. त्यानंतर कटर मिळवून हे पाच जण दररोज बरॅकीचे लोखंडी गज कापू लागले. यावेळी त्यांच्या बरॅकीत १५६ कैदी होते. मात्र, सत्येंद्र गुप्ता, बिसेन आणि अन्य आरोपींच्या खतरनाक इराद्यांचा भंडाफोड केल्यास जीव जाऊ शकतो, हे ध्यानात आल्यामुळे ते गप्प बसले. शेवटी ३० मार्चच्या मध्यरात्री खिडकीचे गज कापले गेल्यामुळे त्यांनी पळून जाण्याच्या कटाची अंमलबजावणी केली. पहाटे २.३०च्या सुमारास ते कारागृहाबाहेर पडल्यानंतर बकरा मंडी, कामठी मार्गाने छिंदवाडा मार्गावर पोहचले. तेथून ते बैतुलला पोहचले. आठ दिवसानंतर त्यांच्या मागावर असलेले पोलीस बैतुलात आल्याची कुणकुण लागताच हे सर्व भोपाळला पळाले.
१३ महिन्यानंतर गवसला बिसेनसिंग
By admin | Updated: April 18, 2016 05:29 IST