नरेश डोंगरे-अयाझ शेख
लोकमत न्यूज नेटवर्क
बरबाद कर दिया हमारे देस को उन जालिमोने
मै ईधर हूं, माँ उधर है..।
और कल जब बात हूई तो,
माँ का सवाल था... बेटा तू तो मजे मे है?
नागपूर : भाईजान ... कुछ नही बोलना हमे ... चाहे तो सजाही दे दिजिये... पर कोई सवाल मत पुछिये. हमारी फॅमिली वहां पर है. कल से बात नही हो पा रही. पता नही किस हाल मे है वो. हमने ईधर कुछ बोल दिया और मीडिया मे खबर बन गयी तो पता नही वो (तालिबानी) उधर हमारे लोगों पर क्या कहर बरसायेंगे. शैतान है वो (तालिबानी). दुवां करो हमारे बंदों (फॅमिली) के साथ कही कुछ ऐसा वैसा न हो...। ही भावना आहे अफगाणी नागरिकांची.
अफगाणीस्तानमध्ये तालिबान्यांनी तख्तापलट केल्यानंतर निर्माण झालेली अराजकता जगाने बघितली आहे. नागपुरात सुमारे ९५ अफगाणी नागरिक आहेत. त्यातील काही जणांना पाच, काहींना सात तर काहींना १० वर्षे झाली आहेत. ते रिफ्युजी म्हणून येथे राहतात, तर सुमारे २० ते २५ जण भारतभ्रमण, तसेच वैद्यकीय कारणाने नागपुरात आले आहेत. त्यातील काही जण गिट्टीखदान, काही जरीपटका, जाफरनगर, तर काही तहसील परिसरात अस्थायी वास्तव्याला आहेत. त्यातील काही जणांच्या व्हिसाची मुदत संपण्याच्या मार्गावर आहे. त्यांना परतीचे वेध लागले असतानाच अफगाणीस्तानमध्ये अराजकता निर्माण झाली. त्यामुळे नागपुरात टुरिस्ट, मेडिकल व्हिसावर आलेले अनेक जण कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. तालिबान्यांच्या क्राैर्याची त्यांना कल्पना असल्याने रविवारपासून त्यांची अस्वस्थता टोकाला पोहोचली आहे. नातेवाईकांना फोनही लागत नसल्याने तेसुद्धा प्रचंड दहशतीत आले आहेत. चिपकून बसावे तसे ते टीव्हीसमोर बसून आहेत. त्यांच्यापैकी काही जणांशी ‘लोकमत’ने संपर्क केला. त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपण कुण्या पत्रकाराशी बोलतो आहोत, हे लक्षात आल्यानंतर ते कमालीचे विचलित झाले. पाहिजे तर आम्हाला कारागृहात टाका; परंतु आम्हाला तेथील परिस्थितीची माहिती विचारू नका, अशी विनवणी ते करीत आहेत. आमचे नातेवाईक तिकडे आहेत. आम्ही इकडे काही बोललो तर तालिबानी तिकडे आपल्या नातेवाइकांचे हाल करतील, अशी भीती त्यांना वाटत आहे. टीव्हीवर काबूल आणि अफगाणीस्तानमधील अन्य ठिकाणचे चित्र काहीच नाही. आम्हाला जे माहीत आहे, ते यापेक्षा किती तरी भयावह आहे. आठवले तरी ‘राैंगटे’ येतात, असे ही मंडळी सांगतात. त्यावरून तालिबान्यांच्या दहशतीची कल्पना यावी. टीव्हीवर दिसणारे चित्र त्यांच्या हृदयाची धडधड वाढवून गेले आहे. अशात नेटवर्क बिघडल्याने आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत गेल्या ३६ तासांपासून संपर्क होत नसल्याने ही मंडळी चिंताक्रांत झाली आहे.
---
पाकिस्तानवर प्रचंड रोष
कधी काळी कलाकुसर, शाही खानपान आणि रहनसहनसाठी आमचा देश ओळखला जायचा. अलीकडे मात्र ‘आतंक अन् आक्रोश’च अफगाणच्या वाट्याला आला आहे. अलीकडे निर्माण झालेल्या स्थितीला पाकिस्तानच कारणीभूत असल्याची संतप्त भावनाही ही मंडळी व्यक्त करीत आहेत. भारतात आम्हाला ‘अपनो में’ असल्याची अनुभूती मिळते.
----
ऑन रेकॉर्ड अफगाणी
-नागपुरात ९५ अफगाणी नागरिक
-रिफ्यूजी म्हणून वास्तव्य
-१५ ते २० जण पाहुणे
-कुणाजवळ मेडिकल तर कुणाजवळ टुरिस्ट व्हिसा
-----------------
अफगाणी नागरिकांची स्थिती आणि भावना
-खांगुल मोहम्मदी
एक वर्षापूर्वी अफगाणीस्तानला नातेवाईकांच्या भेटीला गेलो होतो. तेव्हा ठरल्याप्रमाणे नातेवाईक या महिन्यात नागपुरात येणार होते; परंतु आता निर्माण झालेल्या स्थितीमुळे पत्नी व मुले काबूलमध्ये तर इतर नातेवाईक पक्तिकामध्ये अडकले आहेत. त्यांना भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
------------
अर्झ मोहम्मद
हे सध्या ताजबागमध्ये राहतात. तालिबानच्या हल्ल्यामुळे अफगाणीस्तानमधील सर्व व्यवसाय बंद झालेत. त्यामुळे नातेवाईकांकडील पैसे संपले आहेत. त्यांचे जगणे कठीण झाले आहे. त्यांना नागपुरातून पैसे पाठविण्याचा मार्गही उपलब्ध नाही. त्यामुळे परिस्थिती शांत होण्याची प्रतीक्षा करीत आहे.
------------