नागपूर : ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या प्रमुख माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखा कुंभारे यांनी महाबोधी महाविहारमुक्तीकरिता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ॲड. कुंभारे यांनी स्वत: अर्जदार म्हणून तब्बल ३० वर्षांनंतर याचिका दाखल केली आहे. याचिका दाखल करताना मोठ्या सिनियर वकिलांच्या मार्गदर्शनाखाली व तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण कायदेशीर अभ्यास करूनच ही याचिका दाखल करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
भारताकरिता नव्हे तर संपूर्ण जगातील बौद्धांचे श्रद्धास्थान असलेल्या बिहार राज्यातील बोधगया येथील महाबोधी महाविहाराच्या मुक्तीकरिता आता आंदोलनासोबतच कायदेशीर लढा देण्याची गरज असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यापूर्वी सन २०१२ मध्ये भन्ते आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका प्रलंबित आहे. निश्चितच भन्ते ससाईजी यांनी पूर्वी दाखल केलेल्या याचिकेला ही याचिका पूरक ठरणार असल्याचे ॲड. कुंभारे यांनी म्हटले आहे.
रामजन्मभूमीच्या धर्तीवर महाबोधी महाविहाराची लढाई जिंकणार
अयोध्या येथील रामजन्मभूमीच्या संदर्भात सन २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आस्थेच्या आधारावर निर्णय दिलेला आहे. या निर्णयाच्या आधारावर मी याचिका दाखल केली आहे. रामजन्मभूमीच्या धर्तीवर महाबोधी महाविहारमुक्तीची लढाई आम्ही जिंकणार, असा विश्वास ॲड. सुलेखा कुंभारे यांनी व्यक्त केला आहे.