नागपूर : पंचायत समिती हिंगणा अंतर्गत नुकत्याच पार पडलेल्या शिक्षक समायोजन प्रक्रियेत प्रचंड अनियमितता झाल्याचे आढळून आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडून सदर समायोजन प्रक्रिया रद्द करण्यात आली. तसेच जि.प. स्तरावरून उपशिक्षणाधिकारी यांचे उपस्थितीत नव्याने समायोजन प्रक्रिया राबविण्यात आली.
२६ जुलै रोजी सर्व पं.स. स्तरावर ३० सप्टेंबर २०२० च्या पटावर अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांच्या समायोजनासाठी समुपदेशन प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. परंतु हिंगणा पं.स.मध्ये सदर प्रक्रियेत समायोजनाबाबतचे शासन निर्णयातील तरतुदी व मार्गदर्शक सूचनांचे सर्रास उल्लंघन करण्यात आले होते. त्यामुळे सदर समायोजन प्रक्रिया रद्द करून नव्याने समायोजन प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती. चौकशीअंती तथ्य आढळून आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समायोजन प्रक्रिया रद्द ठरवून उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) यांचे उपस्थितीत समायोजन प्रक्रिया नव्याने पार पाडण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार १८ ऑगस्ट रोजी पं.स. हिंगणा येथे खंड विकास अधिकारी विश्वास सलामे यांचे अध्यक्षतेखाली व उपशिक्षणाधिकारी साबिरा शेख व सुजाता आगरकर, गटशिक्षणाधिकारी सानिया मोडक यांचे उपस्थितीत नव्याने समायोजन प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये पूर्वीच्या समायोजन प्रक्रियेत ज्या ९ शिक्षकांची दुसऱ्या शाळेत बदली करण्यात आली होती त्यापैकी ८ शिक्षकांच्या बदल्या रद्द ठरवत त्यांच्या मूळच्या शाळेतच पदस्थापना देण्यात आली.
- समायोजन प्रक्रिया रद्द होण्याची पहिलीच वेळ
पं.स. स्तरावर पार पाडलेली समायोजन प्रक्रिया संपूर्णपणे रद्द ठरविणे व त्यातही एवढ्या मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचे निष्पन्न होण्याची अलिकडच्या काळात पहिलीच घटना असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. तत्कालीन गटशिक्षणाधिकारी जयश्री जोशी यांच्या कारभारावर त्यांनी ठपका ठेवला आहे.