लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गणराज्यदिनी शहरात कुठे काही गडबड होऊ नये किंवा समाजकंटकांनी कोणता अनुचित प्रकार करू नये म्हणून पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त लावला आहे. विधानभवन, दीक्षाभूमी, विभागीय आयुक्तालयासह शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांनी अतिरिक्त सुरक्षाव्यवस्था उभारली असून, शहरातील संवेदनशील स्थळे, झोपडपट्ट्यांमध्ये गणराज्य दिनाच्या पूर्वसंध्येपासूनच गस्त सुरू करण्यात आली आहे.
गणराज्य दिनाचे निमित्त साधून शहरातील काही टवाळखोर रॅली काढून हुल्लडबाजी करतात. मोठमोठ्याने डीजे वाजवितात. यंदा असे काहीही प्रकार घडणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सर्व ठाणेदारांना दिले आहे. शहरातील सुमारे पाच हजार पोलीस अधिकारी-कर्मचारी गणराज्य दिनाचा बंदोबस्त सांभाळणार असून, चौकाचाैकात, गल्लीबोळात बीट मार्शल गस्त करून अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी घेणार आहेत.
नागरिकांनी गणराज्य दिन साजरा करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा आणि कोणताही अनुचित प्रकार घडताना दिसला किंवा कुठे काही संशयास्पद वस्तू अथवा व्यक्ती आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केले आहे.
----