दोघांना अटक : टोळीचे दिल्ली आणि पंजाब कनेक्शन वर्धा : केबीसीची २५ लाख रुपयांची लॉटरी लागल्याचे सांगून वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एकाला एक लाखाने गंडविण्याऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी दिल्ली व पंजाब येथून दोघांना अटक करण्यात आली आहे. रामकृष्ण चंद्रशेखर चौधरी (२२) रा. पटोरी, पोस्ट पटोरी बसंत, पो.स्टे. मोरो बसवारा व अमित कुमार शारदानंद झा, (२२) रा. बिजालपुरा, पोस्ट लोहा, पो.स्टे. अरेर, जिल्हा मधुबनी,(बिहार), अशी आरोपींची नावे आहेत.ही टोळी साखळी पद्धतीने गुन्हे करण्यात सराईत असल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले आहे. ही टोळी मोठी असल्याचा पोलिसांना संशय आहे. सेलू तालुक्यातील हिंगणी येथील सुनील महादेव मोहर्ले (३५ ) याची या टोळीने फसवणूक केली होती. याप्रकरणी तक्रारीनुसार फिर्यादीला मोबाईलवर ००९२३०४९५२०७१९ या क्रमांकाने फोन आला होता. केबीसी लॉटरीमधून तुम्हाला २५ लाख रुपयांची लॉटरी लागली आहे. ही रक्कम घेण्याकरिता आयसीआयसीआय बँकेच्या वेगवेगळ्या तीन अकाऊंट नंबरवर इन्कम टॅक्स, सर्व्हीस टॅक्स आदींकरिता एकूण एक लाख सात हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. या आमिषाला बळी पडून मोहर्ले यांनी दिलेल्या बँक खात्यात रक्कम जमा केली. मात्र त्यांना कोणतीही लॉटरीची रक्कम मिळाली नाही. आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच मोहर्ले यांनी वर्धा शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी भादंवि कलम ४२०, सहकलम ६६(अ)(डी) माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदविला. तपासात आयसीआयसीआय बँक खात्याची माहिती घेतली असता सदर खाते ेगुडगाव, गाझियाबाद, उ.प्र., फगवाडा, पंजाब येथील असल्याचे निष्पन्न झाले. यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक तत्काळ तिकडे रवाना झाले.तक्रारीत असलेला खाते क्रमांक २६२६०१५०२०९७ चा धारक रामकृष्ण चंद्रशेखर चौधरी (२२) रा. पटोरी, पोस्ट पटोरी बसंत, पो.स्टे. मोरो बसवारा, जिल्हा दरभंगा (बिहार) याचे हे खाते असल्याचे उघड झाले. यावरून त्याला फगवाडा, पंजाब येथून ताब्यात घेतले. त्याने त्याचे एटीएम कार्ड त्याचा मित्र अमित कुमार शारदानंद झा, (२२) रा. बिजालपूरा, पोस्ट लोहा, पो.स्टे. अरेर, जिल्हा मधुबनी (बिहार) याला दिल्याची माहिती दिली. त्याच्यामार्फत गुन्ह्याची सूत्रे हलविली असल्याची शक्यता वाटताच त्याचा शोध घेऊन त्याला अशोकनगर, नोएडा, दिल्ली येथून ताब्यात घेतले. त्याला वर्धा येथे आणून सखोल विचारपूस केली असता या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निश्चित झाल्याने दोघांना अटक करण्यात आली. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक एम.डी. चाटे, सहायक पोलीस निरीक्षक व्ही.बी. नाईक, जमादार संजय गायकवाड, मनोज नांदूरकर, किशोर आप्तूरकर, अजय रिठे, कुलदीप टांकसाळे, चंद्रकांत जीवतोडे यांनी केली. याप्रकरणी तपासात मोठे गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तविली आहे.(प्रतिनिधी)
लॉटरीच्या नावावर फसविणारी टोळी सक्रिय
By admin | Updated: July 13, 2014 01:08 IST