नागपूर : नॉयलॉन मांजावर आणि प्लास्टिक पतंगांवर बंदी असतानाही शहरात मोठ्या प्रमाणावर त्याची विक्री होत असल्याने मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या आदेशानुसार मनपाच्या दहाही झोनमधील उपद्रव शोध पथकाने ठिकठिकाणी धाडी टाकल्या. नायलॉन मांजा आणि प्लास्टिक पतंगांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांसह नायलॉन मांजाने आणि प्लास्टिक पतंग उडविणाऱ्या व्यक्तींवरही मोठी कारवाई शुक्रवारी करण्यात आली.
महापालिकेच्या दहाही झोनअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. यात २०१ दुकानांची उपद्रव शोध पथकाने तपासणी केली. यात नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या आणि प्लास्टिक पतंग विकणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करीत आठ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच नॉयलॉन मांजाचा वापर करून पतंग उडविणाऱ्या १०९ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. या संपूर्ण कारवाईत सुमारे २२२ पतंग व २ चक्री जप्त करण्यात आल्या.
सर्वाधिक कारवाई हनुमान नगर झोनमध्ये
नायलॉन मांजा आणि प्लास्टिक पतंगविरोधात उघडलेल्या मोहिमेमध्ये शुक्रवारी दहाही झोनमध्ये कारवाई करण्यात आली. यात सर्वाधिक ४५ दुकाने हनुमान नगर झोनमध्ये तपासण्यात आली. पतंगबाजांवरील कारवाईमध्ये गांधीबाग झोन अव्वल असून, सर्वाधिक १५ पतंगबाजांवर या झोनमध्ये कारवाई करण्यात आली.