नागपूर : राज्यात खासगी प्रवासी वाहतूक करणा-या प्रवासी बसेसची विशेष तपासणी मोहीम ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजतापासून दुस-या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत करण्याचे परिवहन आयुक्तांनी सूचना केल्या आहेत. विशेष म्हणजे, तपासणी पथकातील प्रतिअधिका-याने कमीतकमी ३ खासगी प्रवासी बसेसवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. नागपूर पूर्व व शहर आरटीओ कार्यालयाकडून चार पथकांकडून तपासणीला सुरूवात होताच दोन तासातच, रात्री ८ वाजेपर्यंत जवळपास २० खासगी बसेसवर कारवाई करण्यात आली होती.
लांब पल्ल्यांच्या मार्गावर रात्रीच्यावेळी खासगी बसमधून प्रवास करणा-यांची संख्या मोठी आहे. कोरोनाची धास्ती कमी होताच खासगी बसेसची रहदारीही वाढली आहे. यामुळे पुन्हा एकदा खासगी बसेसच्या समस्यांचा पाढा वाचाला जात असतानाच परिवहन आयुक्तांनी राज्यभर तपासणी मोहीम हाती घेतली आहे. याची माहिती शुक्रवारीच सर्व आरटीओ कार्यालयांना दिली. सर्वांनी तातडीने पथक तयार केले. प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर शहर व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्व नागपूर यांनी मिळून चार पथके तयार केली. सूचनेनुसार पथकांमध्ये वरिष्ठ अधिका-यांच्या नेमणुका करण्यात आल्या. सायंकाळी ६ वाजतापासून ही चारही पथके खासगी बसेस सुटण्याच्या ठिकाणापासून ते त्यांच्या मुख्य रहदारीच्या मार्गावर उभे राहून तपासणीला सुरूवात केली. प्राप्त माहितीनुसार, रात्री ८ वाजेपर्यंत या पथकाकडून २० खासगी बसेसवर कारवाई झाली. कारवाईचा अहवाल परिवहन आयुक्तांकडे ६ फेब्रुवारी रोजी सादर करण्याचा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
- तपासणीत यावर दिला भर
खासगी बसेसच्या तपासणीत कोणत्या बाबींवर भर द्यावा, याची माहितीही पथकाला देण्यात आली. यात विनापरवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करून वाहन चालविणे, टप्पा वाहतूक, प्रवासी बसमधून अवैधरीत्या मालवाहतूक, योग्यता प्रमाणपत्र, रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेल लाइट, वायपर आदींची तपासणी, वाहनांमध्ये बेकायदेशीर केलेले फेरबदल, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, मोटार वाहनकर व प्रवाशांकडून जादा भाडे आकारणे आदींची पाहणी करण्याचा सूचना आहेत.
-प्रवाशांची पर्यायी व्यवस्था करण्याच्याही सूचना
खासगी बसेस सुटण्याच्या ठिकाणी तसेच प्रमुख रस्त्यांवर वायू पथकाने तपासणी मोहीम राबविण्याच्याही सूचना आहेत. कारवाईदरम्यान प्रवाशांना नाहक त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याचे व प्रवाशांची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ यांच्याशी संपर्क साधण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. बातमी लिहीपर्यंत कुठल्याही प्रवाशाची तक्रार प्राप्त झाली नव्हती.