लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेडिकलमधून सोमवारी रात्री पळून गेलेल्या आरोपीच्या मुसक्या बांधण्यात मंगळवारी सकाळी पोलिसांनी यश मिळवले. कृष्णा हरिदास डांगरे (२५) असे आरोपीचे नाव आहे.
कुख्यात गुन्हेगार असलेला डांगरे तीन वर्षांपासून कारागृहात होता. त्याला अपहरण, बलात्काराच्या आरोपात सीताबर्डी पोलिसांनी अटक केली होती. कारागृहात डांबल्यानंतर त्याला टीबीची लागण झाली. त्यामुळे काही दिवसांपासून त्याच्यावर मेडिकलच्या टीबी वाॅर्डात उपचार सुरू होते. त्याच्यावर देखरेख करण्यासाठी दोन पोलिसांना नियुक्त करण्यात आले होते. सोमवारी रात्री १० च्या सुमारास बाथरुमच्या बहाण्याने डांगरे उठला आणि पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला. त्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली. इमामवाडा, अजनी सक्करदरा, नंदनवन, गणेशपेठ आदी आजूबाजूच्या पोलीस ठाण्यांत माहिती देऊन आरोपी डांगरेचा पोलिसांनी शोध सुरू केला. मध्यरात्र होऊनही तो हाती लागला नाही. त्यामुळे नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून शहर तसेच ग्रामीण पोलिसांना मेडिकलमधून बलात्काराचा आरोपी फरार झाल्याचे कळविण्यात आले. त्यामुळे पोलीस यंत्रणा आरोपी डांगरेचा शोध घेऊ लागली. आज भल्या सकाळी एक व्यक्ती संशयास्पद अवस्थेत पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्ती पथकाला दिसला. त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी विचारणा केली असता तो सोमवारी रात्री मेडिकलमधून पळून गेलेला आरोपी डांगरेच असल्याचे स्पष्ट झाले. ही माहिती इमामवाडा पोलिसांना कळविण्यात आली. मंगळवारी दुपारी इमामवाडा पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध पळून जाण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
---
... त्याने आधीच ठरवले होते!
आरोपी डांगरेने मेडिकलमधून पळून जाण्याचा कट काही दिवसांपूर्वीच रचला होता. त्यानुसार पॅरालिसीससारखा पाय लुळा पडल्याचे तो पोलिसांना सांगायचा. बाथरुमला जाताना दोन-तीन दिवसापासून लंगडत चालायचा. त्याची ती अवस्था पाहून तो पळून जाणार नाही, असा गैरसमज पोलिसांनी करून घेतला होता. दरम्यान, सोमवारी रात्री बाथरुमला गेल्यानंतर परत येताना पोलीस त्याच्यापासून काही अंतरावर थांबले. डांगरे बेड ऐवजी दारातून बाहेर जात असल्याने एका पोलिसाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या हाताला झटका मारून डांगरे तेथून सुसाट वेगाने पळून गेला. त्याला शोधण्यासाठी त्याची देखरेख करणारे दोन्ही पोलीस कर्मचारी, इमामवाडाचे ठाणेदार मुकुंद साळुंके आणि त्यांचे सहकारी टीबी वॉर्डच्या बाजूला असलेल्या झुडपी भागात रात्रभर शोधाशोध करीत होते; मात्र आरोपी त्यांच्या हाती लागला नाही.
----
पोलिसांचा जीव भांड्यात
पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी पळाल्याची आठ दिवसातील ही दुसरी घटना आहे. गेल्या आठवड्यात पाचपावली पोलीस ठाण्यातून रेमडेसिविरची काळाबाजारी करणारा उबेद नामक आरोपी पळून गेला होता. चार दिवसानंतर पोलिसांनी त्याला पकडले तर आता मेडिकलमधून डांगरे पळून गेला होता. तो हाती लागल्याने पोलिसांचा जीव भांड्यात पडला आहे.
---