नागपूर : आपण गुप्त माहितीच्या आधारावार संशयित आरोपींची रेखाचित्रे काढली नव्हती , असे तपास अधिकारी राज्य सीआयडीचे उप अधीक्षक माधव गिरी यांनी मोनिका किरणापुरे हत्याकांड खटल्याच्या सुनावणी दरम्यान अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. डब्ल्यू. चांदवानी यांच्या न्यायालयात उलट तपासणी साक्ष देताना स्पष्ट केले. दीर्घ अवकाशानंतर गिरी यांची अर्धवट राहिलेली उलट तपासणी साक्ष आज पुन्हा प्रारंभ झाली. आपण दोन व्यक्तींचे स्केच तयार केले होते, ते प्रसिद्धीस देण्यात आले होते, असेही त्यांनी कबूल केले. आरोपी कुणालच्या एका मैत्रिणीने आपले कुणालशी ‘अफेअर’ होते, असे न्यायालयात सांगितले होते. ही बाब तिच्या पोलीस बयानात नाही, असे गिरी यांनी कबूल केले. न्यायालयात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, बचाव पक्षाचे वकील अॅड. सुदीप जयस्वाल, अॅड. नितीन हिवसे उपस्थित होते. गिरी यांची उलट तपासणी साक्ष संपली असून पुन्हा दोन साक्षीदारांच्या साक्षी तपासल्या जाणार आहेत. पुढील सुनावणी २३ जानेवारी रोजी होईल. (प्रतिनिधी)
गुप्त माहितीच्या आधारावार आरोपींचे ‘स्केच’ काढले नव्हते
By admin | Updated: January 10, 2015 02:42 IST