लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : होंडा सिटी कारने दरोड्यासारखा गंभीर गुन्हा करायला निघालेल्या सहा सशस्त्र भामट्यांच्या पोलिसांनी मुसक्या बांधल्या. कैची ऊर्फ मुकेश महादेवराव हेडाऊ, घोडा ऊर्फ प्रफुल्ल महादेवराव दांडेकर, विजय चंद्रभानजी लाटकर (रा. तिघेही खैरीपुरा लालगंज), हेमंत थानसिंग यादव, भूषण भगवान लुटे आणि राकेश लीलाधर सिवरकर (रा. भवानीनगर पारडी) अशी आरोपींची नावे आहेत.
हे सर्व शुक्रवारी रात्री होंडा सिटी कार एमएच ०५-एआर ७३६९ ने लालगंजमधील शीतलामाता मंदिराजवळच्या मोकळ्या मैदानात आले. ही माहिती कळताच युनिट तीनच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तेथे छापा घालून मध्यरात्री या सर्वांना जेरबंद केले. आरोपींकडून कार तसेच तीन चाकू, पाच मोबाईल, लाकडी दांडा, मिरची पावडर तसेच नायलॉनची दोरी जप्त करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
---