हुंड्यासाठी छळ, विवाहितेची तक्रार : सासरची मंडळी गजाआडनागपूर : माहेरून पाच लाख आणि कार आणावी यासाठी विवाहितेचा छळ केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी नवृत्त न्यायाधीशासह दहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. पूजा स्वप्नील हजारे (वय २३) असे तक्रारकर्त्या विवाहितेचे नाव आहे. मारुती रामाजी साखरकर (रा. दिघोरी) यांची ती मुलगी होय. साखरकर पोलीस कर्मचारी आहेत. नरेंद्रनगरमधील स्वप्नील हजारे या अभियंत्यासोबत तिचा विवाह झाला होता. स्वप्नीलचे वडील नारायणराव हजारे नवृत्त न्यायाधीश असल्याचे पोलीस सांगतात. पूजाच्या तक्रारीनुसार, लग्नात पाच लाख आणि कार मिळाली नाही म्हणून सासरची मंडळी पूजाचा अधूनमधून छळ करीत होती. हजारे परिवाराचे नातेवाईकही या छळात सहभागी व्हायचे. टोमणे मारणे, उपाशी ठेवणे आणि मारहाण करणे, असेही प्रकार घडत होते. जानेवारी २0१३ पासून ५ जुलै २0१३ पर्यंंत हा छळ सुरू होता. त्याला कंटाळून पूजाने आईवडिलांकडे तक्रार केली. आईवडिलांनी सासरच्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही पक्षातील विसंवाद वाढतच गेला आणि अखेर पूजाने नवरा, सासरा, सासू, नणंद आणि सासरशी संबंधित अन्य नातेवाईक यांच्याविरुध्द अजनी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी दोन्ही पक्षाकडील व्यक्तींचे बयान नोंदविल्यानंतर स्वप्नील, त्याचे वडील नारायणराव हजारे, आई संध्या, बहीण नेहा (रा. सर्व नरेंद्रनगर) श्वेता बालपांडे (अंबाझरी), तसेच वर्षा मस्के, बाळू मस्के, विलास मस्के, गिरीश मस्के आणि बंडू मस्के (रा. सर्व खामला) अशा दहा जणांविरुद्ध कलम ४९८ (अ),३२३, ५0६ (ब), ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली. (प्रतिनिधी)
नवृत्त न्यायाधीशावर गुन्हा दाखल
By admin | Updated: May 31, 2014 00:59 IST