नागपूर : प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या बहुचर्चित युग चांडक अपहरण-खून खटल्याच्या सुनावणी दरम्यान आज मुख्य आरोपीने पिंजऱ्यात उभे राहून साक्ष देत असलेल्या आपल्या मित्राला चक्क गद्दार म्हटले. मुख्य आरोपी राजेश दवारे याचा मित्र संदीप कटरे हा साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभे राहून साक्ष देत असताना आरोपीच्या बाकावर बसून असलेला आरोपी राजेश दवारे हा भर न्यायालयात उभा झाला. तो साक्षीदाराला म्हणाला, ‘अबे गद्दार, जरा जोरसे बोल हमे भी सुनाई आना चाहिए’. लागलीच न्यायालयाने आरोपीला समज देऊन गप्प केले. या प्रकाराने काही वेळ संपूर्ण न्यायालय अचंबित झाले होते. राजेशने रचला होता कट४राजेशनेच युगच्या अपहरणाचा कट रचला होता, अशी बेधडक साक्ष राजेशचा मित्र संदीप किसनलाल कटरे याने न्यायालयात दिली. घटनेच्या वेळी संदीप हा कामठी मार्गावरील एका महाविद्यालयात बीसीसीए द्वितीय वर्षाला शिकत होता. शिकत असतानाच तो एका को-आॅपरेटिव्ह सोसायटीत कॉम्प्युटर आॅपरेटर म्हणून ‘पार्ट टाईम’ काम करायचा. संदीप, राजेश आणि आणखी एक, असे तिघे मित्र होते. फेब्रुवारी २०१४ मध्ये तिघेही आपापल्या गर्लफ्रेंडस्ना घेऊन भंडारा जिल्ह्यातील नवेगावला गेले होते. त्यानंतर राजेश हा त्यांना सावरी बालाघाट येथील आपल्या बहिणीच्या घरी घेऊन गेला होता. त्यांनी रात्रभर मुक्काम केला होता. आपली सरतपासणी साक्ष देताना तो पुढे म्हणाला की, राजेशने मला पिवळी नदी येथे बोलावले होते. राजेशसोबत अरविंद आणि आणखी दोन जण होते. त्याने आपल्या दोन मित्रांसोबत माझी ओळख करून दिली. राजेश तेव्हा मला म्हणाला, ‘तेरे मालिक का काम तो नही हो रहा. मेरे दिमाग में नया प्लॅन आया है. एक बच्चे को किडनॅप करनेवाला हूँ. उसके बाप के पास बहुत पैसा है, हमे सबको अच्छा पैसा मिलेगा’. मी त्याला किसका बच्चा है, असे विचारताच ‘वक्त पे बताऊंगा’, असे म्हटले होते. त्याच्या दोन्ही मित्रांनी हे काम करण्यास मनाई करताच त्याने त्यांना शिव्या दिल्या होत्या. राजेशने मला ३० आॅगस्ट रोजी मोबाईलवर संपर्क केला होता. ‘ एक तारीख को काम करना है’, असे त्याने म्हटले होते. तेव्हा मी त्याला गावी असल्याचे आणि उद्या परत येत असल्याचे सांगितले होते. पुन्हा त्याने १ सप्टेंबर रोजी फोन केला होता. अभी बच्चे को किडनॅप करना है’, असे तो म्हणाला होता. लागलीच आपण त्याला ‘तेरे साथ काम करना नही’, असे म्हटले होते. त्यावर त्याने चिडून मला शिव्या दिल्या होत्या. २ सप्टेंबर रोजी आपण युगच्या अपहरणाची बातमी वृत्तपत्रात वाचली होती. बातमीत डॉ. चांडक यांचा मोबाईल क्रमांक होता. लागलीच त्यांना संपर्क केला. ‘यह काम आपके क्लिनिक में काम करनेवाला राजेश दवारेही कर सकता है’, असे आपण सांगितले होते. साक्षीदार महिलाही संतापलीडॉ. मुकेश चांडक यांच्याकडे स्वयंपाकाचे काम करणारी महिला सुशीला ऊर्फ सुषमा गणेश भोयर आपली उलट तपासणी साक्ष देत असताना चक्क बचाव पक्षाच्या वकिलावर संतापली. बचाव पक्षाच्या वकिलाने तिला ‘तुम्ही डॉक्टर चांडक यांच्या सांगण्यावरून येथे साक्ष देण्यास आले आहात’, असे म्हणताच ती संतापली. मोठ्या त्वेषात आपल्या पर्समधील समन्स काढत तिने वकिलाला दाखविला आणि म्हणाली, पोलिसांनी हा कागद देऊन मला कोर्टात पाठविले आहे. आपली सरतपासणी साक्ष देताना ती म्हणाली की, गेल्या चार वर्षापासून आपण डॉ. चांडक यांच्याकडे काम करीत आहे. सकाळी ८ ते १० आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६ पर्यंत आपले काम असते. धृव आणि युग हे शाळेतून परतायचे तेव्हा आपण त्यांना फराळ करून देत होतो. घटनेच्या दिवशी मी दुपारी ३.३० वाजता कामावर आले असता धृव घरी आला होता. युग यायचा होता. म्हणून मी त्याची वाट पाहत होती. त्याच वेळी घरच्या फोनवर फोन आला होता. फोन करणाऱ्या मुलाने विचारले होते. युग घरी आला काय, मी नाही म्हटले. फोन क्लिनिक मधून आला असेल म्हणून मी मॅडमशी स्वयंपाकाबाबत बोलण्याची इच्छा केली असता फोन करणाऱ्याने फोन बंद केला होता, असेही तिने सांगितले. न्यायालयात आज संजय वाधवानी, विक्रम सारडा, नरेश मछाले, मनोज ठक्कर यांचीही साक्ष नोंदवण्यात आली. न्यायालयात सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील ज्योती वजानी आणि सरकार पक्षाला सहाय्य म्हणून फिर्यादी डॉ. मुकेश चांडक यांच्यावतीने अॅड. राजेंद्र डागा तर बचाव पक्षाच्या वतीने अॅड. प्रदीप अग्रवाल, अॅड.मनमोहन उपाध्याय आणि अॅड. प्रमोद उपाध्याय यांनी काम पाहिले. पोलीस निरीक्षक सत्यनारायण जयस्वाल हे तपास अधिकारी आहेत. (प्रतिनिधी)
आरोपीने साक्षीदार मित्राला म्हटले ‘गद्दार’
By admin | Updated: January 10, 2015 02:41 IST