नागपूर : हत्येच्या आरोपात विशेष मोक्का न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला खतरनाक गुंड सौरभ विलास कडलग (वय २४) हा संचित रजेवर कारागृहातून बाहेर आल्यानंतर फरार झाला. त्यामुळे खळबळ उडाली आहे. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुना बाबुलखेडा भागात राहणारा सौरभ कडलग याला विशेष मोक्का न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. कारागृहात शिक्षा भोगत असताना त्याने संचित रजेसाठी अर्ज केला होता. त्यानुसार, त्याला २१ दिवसाची संचित रजा मंजूर करण्यात आली. २ जून २०१७ ला तो कारागृहाबाहेर आला. त्याला ठरल्याप्रमाणे २५ जूनला दुपारी १ वाजतापर्यंत कारागृहात परत जायचे होते. मात्र, तो पळून गेला. कडलग फरार झाल्याचे लक्षात आल्यानंतर कारागृह प्रशासनाने अजनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी कडलगविरुद्ध कलम २२४ अन्वये गुन्हा दाखल केला. त्याचा शोध घेतला जात आहे.
संचित रजेवरील आरोपी फरार
By admin | Updated: June 26, 2017 14:19 IST