बँक अधिकाऱ्यांची धावपळ : पळाले तोंडचे पाणी नागपूर : बँक अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे एका खातेधारकाच्या खात्यात चक्क २५ लाख, ६० हजार रुपये जमा झाले. या अनपेक्षित धनलाभाने सुखावलेल्या ‘त्या’ खातेधारकाने काही रक्कम स्वत: खर्च केली तर काही रक्कम आपल्या स्वकीयांना देऊन धडाक्यात दिवाळी साजरी केली. दुसरीकडे चूक लक्षात आल्यानंतर बँक अधिकाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. संबंधित खातेधारक रक्कम परत करण्यास टाळाटाळ करीत असल्याने बँक अधिकाऱ्यांनी सदर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. दि महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह बँक लि.ची सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शाखा आहे. बँकेचे खातेधारक राम फकीर अंबोरे (रा. चिखली, जि. बुलडाणा) यांच्या खात्यात चुकून २५ लाख ६० हजार रुपये जमा झाले. या अनपेक्षित धनलाभामुळे सुखावलेल्या राम अंबोरे यांनी त्यातील काही रक्कम स्वप्निल राम अंबोरे (रा. चिखली) आणि रंजना मारोती भगत (रा. अहमदाबाद, गुजरात) यांच्या खात्यात जमा केली. ५ आॅगस्ट ते २० डिसेंबर दरम्यानच्या आर्थिक व्यवहारातून उपरोक्त तिघांनी धडाक्यात दिवाळी साजरी केली. दरम्यान, ही बाब लक्षात आल्यानंतर बँक प्रशासनात एकच खळबळ उडाली. शाखा व्यवस्थापक चंद्रकांत मुरलीधर रोठे (वय ५०) यांनी राम अंबोरेंशी संपर्क साधला. चुकून तुमच्या खात्यात आम्ही रक्कम वर्ग केल्याचे सांगितले. ती परत करण्याचीही विनंती केली. अंबोरे यांनी त्यांना प्रतिसाद देताना आपल्या खात्यातील रक्कम दुसऱ्यांच्या खात्यात जमा केल्याचे तसेच काही रक्कम खर्च झाल्याचे सांगितले. बँक प्रशासनाने तातडीने रक्कम परत करण्यास सांगितले असता अंबोरेंनी काही दिवसांची मुदत मागितली. मात्र, अद्याप रक्कम बँकेत जमा केली नाही. त्यामुळे शाखा व्यवस्थापक रोठे यांनी सदर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी उपरोक्त तीन आरोपीविरुध्द फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. (प्रतिनिधी) नोटाबंदी अन् चंगळ नोटाबंदीच्या निर्णयामुळे अनेक खातेधारकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. बँक अधिकारी, कर्मचारी त्रास देत असल्याचीही अनेक खातेधारकांची ओरड आहे. हे प्रकरण उलटे आहे. येथे खातेधारकाची चंगळ झाली असून, त्याने बँक अधिकाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे.
अनपेक्षित धनलाभामुळे खातेधारकाची दिवाळी
By admin | Updated: December 25, 2016 02:57 IST