लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अमरावती येथील पथकाने येथील जिल्हा परिषदेत कार्यरत असलेले जिल्हा जलसंधारण अधिकारी रमेशकुमार हिरालाल गुप्ता (वय ५६) यांना मंगळवारी रात्री जेरबंद केले. कंत्राटदाराकडून ७५ हजारांची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.
४४ वर्षीय तक्रारदार शासकीय कंत्राटदार आहेत. त्यांनी रामटेक तालुक्यातील सालई पथराई येथे डीपीसी अंतर्गत नाल्याचे बांधकाम केले होते. या कामाचे बिल आणि १५ लाखांची ग्रँट एकत्र करून गुप्ताने त्यात आपल्या लाचेची वाढीव रक्कम जोडली. त्यानंतर २ टक्के लाचेचे ४० हजार, वाढीव बिलाचे २५ हजार आणि १५ लाखांच्या ग्रॅटपोटी १० हजार असे एकूण ७५ हजार रुपये लाच मागितली. ती द्यायची नसल्याने कंत्राटदाराने एसीबीच्या अधिकाऱ्यांकडे ८ ऑगस्टला तक्रार नोंदवली. शहानिशा केल्यानंतर गुप्ताविरुद्ध सापळा लावण्यात आला. त्याने लाचेची रक्कम त्याच्या उदयनगरातील घरी घेऊन कंत्राटदाराला बोलविले. त्यानुसार, मंगळवारी रात्री लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने गुप्ताच्या मुसक्या बांधल्या. एसीबीच्या अमरावती युनिटचे अधीक्षक विशाल गायकवाड, अतिरिक्त अधीक्षक अरुण सावंत, उपअधीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल तसरे, संतोष इंगळे, ममता अफुणे तसेच कर्मचारी विनोद कुंजाम, युवराज राठोड, ज्योती झाडे, सुनील जायभाये, राजेश कोचे, उपेंद्र थोरात आणि सतीश किटकुले यांनी ही कामगिरी बजावली.
----
स्थानिक अधिकाऱ्यांना दूर ठेवले
विशेष म्हणजे, एसीबीच्या अधिकाऱ्यांनी गुप्तावर कारवाई केल्याची माहिती एसीबीच्या स्थानिक अधिकाऱ्यांनादेखिल दिली नाही. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुप्ताचे निवासस्थान आहे. तेथून या कारवाईचा बोभाटा झाला. त्यानंतर सोशल मीडियावरून गुप्ताला एसीबीने पकडल्याचे वृत्त सर्वत्र पसरले.
----