जलालखेडा : स्थानिक नागरिकांनी गावाचे नाव थुगावदेव बदलवून देवग्राम केले. मात्र, मानसिकता तीच कायम राहिली. कारण, याच देवग्राममध्ये विकृत मनाेवृत्तीच्या तरुणाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर ती घरी एकटी असताना अत्याचार केला. ही घटना शनिवारी (दि. ९) दुपारी घडली असून, पाेलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
शरद गोविंद इंगळे (३२, रा. देवग्राम, ता. नरखेड) असे आराेपीचे नाव असून, त्याला दारूचे व्यसन आहे. पीडित विद्यार्थिनी ही १६ वर्षाची असून इयत्ता दहावीत शिकते. तिचे आईवडील मजुरी करून उदरनिर्वाह करीत असल्याने ते शनिवारी शेतात कामाला गेले हाेते. त्यामुळे ती घरी एकटीच हाेती. शरद तिच्या शेजारी राहत असून, ती घरी एकटी असल्याचे पाहून त्याने घरात प्रवेश केला आणि तिच्यावर अत्याचार केला.
तिने आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक गाेळा झाले. तिने घडलेला प्रकार नागरिकांना सांगितल्याने त्यांनी लगेच पाेलीस ठाणे गाठून तक्रार नाेंदविली. तिची प्राथमिक वैद्यकीय तपासणी जलालखेडा (ता. नरखेड) प्राथमिक आराेग्य केंद्रात करण्यात आली असून, पुढील तपासणीसाठी नागपूरला पाठविण्यात आले. शिवाय, पाेलिसांनी आराेपीस ताब्यात घेतले. याप्रकरणी जलालखेडा पाेलिसांनी भादंवि ३७६ व पाेक्साे ॲक्ट अन्वये गुन्हा नाेंदविला असून, तपास पाेलीस उपनिरीक्षक राजेंद्र साेनवणे करीत आहेत.