लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मालमत्ताकर थकबाकीदारांसाठी महापालिकेने अभय योजना आणली आहे. १५ डिसेंबरपासून सुरू झालेल्या या योजनेत मालमत्ता करावरील शास्ती (दंड) माफ करण्याची तरतूद केली आहे. २५ जानेवारीपर्यंत ३५ हजार ५९२ मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घेतला असून, ९ कोटीचा दंड माफ करण्यात आला, तर ५१४ कोटीच्या थकबाकीपैकी मनपा तिजोरीत ३५ कोटीचा महसूल जमा झाला आहे. जमा झालेल्या महसुलावरून थकबाकीदारांनी अभय योजनेला अपेक्षित प्रतिसाद दिलेला नाही.
महापालिका क्षेत्रातील ६.५० लाख मालमत्ताधारकांपैकी ३ लाख ७३ हजार ९४६ थकबाकीदारांकडे मागील काही वर्षांपासून ५१४ कोटीची थकबाकी आहे. महापालिकेची बिकट आर्थिक स्थिती विचारात घेता, थकबाकी वसुलीसाठी अभय योजना राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. २१ जानेवारीपर्यंत थकीत मालमत्ता कर भरणाऱ्यांना १०० टक्के दंड माफी देण्यात आली. तर २१ जानेवारी ते २२ फेब्रुवारी यादरम्यान थकबाकी भरणाऱ्यांना ५० टक्के दंड माफ केला जाणार आहे.
...
झोनस्तरावरील यंत्रणा फेल
थकबाकी वसुलीसाठी मनपाच्या झोनस्तरावर अभय योजना प्रभावीपणे राबविण्याची गरज होती. मात्र मनुष्यबळाचा अभाव, जनजागृतीकडे दुर्लक्ष, नगरसेवकांची उदासीन भूमिका याचाही वसुलीवर परिणाम झाला. दंड माफ करूनही थकबाकीदारांनी अपेक्षित प्रतिसाद दिला नाही.
....
१४ फेब्रुवारीपर्यंत ५० टक्के विलंब शुल्क माफ
२१ डिसेंबर ते २१ जानेवारी २०२० दरम्यान पाणी बिलावरील विलंब शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले. तर २२ जानेवारी ते १४ फेब्रुवारीदरम्यान विलंब शुल्कावर ५० टक्के सूट मिळणार आहे. त्यानंतर थकबाकीदारांना व्याजासह थकबाकी भरावी लागणार आहे.