नागपूर: उच्च दाबाच्या विजेच्या धक्क्यात गंभीररित्या भाजून दोन्ही गुडघे निकामी झालेल्या २४ वर्षीय राजेश नामक तरुणाला प्लास्टिक सर्जनच्या चमूने गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून पूर्णपणे बरे केले. यामुळे राजेशला आता पुन्हा एकदा सामान्य जीवन जगणे शक्य झाले आहे. नरखेड तालुक्यात बाणोर गावातील रहिवाशी राजेश हा व्यवसायाने शेतकरी आहे. वीज गेल्यामुळे शेतातील डीपीमधील फ्यूज बघायला गेले असताना त्याच्या गुडघ्याला विजेचा तीव्र धक्का बसला. त्यामुळे त्याचे गुडघ्याचे स्नायू आणि त्वचा खोलवर जळाली. दोन्ही गुडघ्यांची हाडे आणि सांधे पूर्णपणे उघडे पडले. ही अत्यंत गंभीर स्थिती होती, ज्यामध्ये सांध्यांची कार्यक्षमता आणि स्थिरता पूर्णपणे नष्ट झाली होती. त्याच्या नातेवाइकांनी त्याला हिंगणा इसासनी येथील लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. येथील डॉक्टरांनी तातडीने शर्थीचे उपचार सुरू केले.
५ तासांत यशस्वी पुनर्रचना शस्त्रक्रिया
हॉस्पिटलचे प्लास्टिक सर्जन डॉ. जितेंद्र मेहता यांनी राजेशला तपासून तातडीने पुर्नरचना शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या शस्त्रक्रियेत त्यांना डॉ. समीर महाकाळकर, डॉ. अश्विनी पंडित, डॉ. देव, डॉ. अभिराम आणि डॉ. के. बी. सिंग या कुशल डॉक्टरांच्या चमूची मदत मिळाली. तब्बल ५ तास चाललेली गुंतागुंतीची ही पुनर्रचना शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.
शरीराच्या विविध भागातून घेतले ‘टिशू’
डॉ. मेहता यांनी सांगितले, गुडघ्यांची कार्यक्षमता आणि स्थिरता पूर्ववत करण्यासाठी रुग्णाच्या शरीराच्या विविध भागांमधून ऊती (टिशू) घेण्यात आल्या. डॉ. महाकाळकर यांनी सांगितले की, सांध्यांची कार्यक्षमता, स्थिरता आणि स्नायूंचे आवरण पूर्ववत करण्यासाठी प्रगत प्लास्टिक रिकन्स्ट्रक्टिव्ह (पुनर्रचना) तंत्राचा वापर करण्यात आला. यात स्नायू आणि कंडरा (टेंडन) यांचीही पूनर्रचना करण्यात आली.
आता सायकल चालवतो आणि कामावरही जातो
शस्त्रक्रियेनंतर महिनो महिने चाललेल्या पुनर्वसन प्रक्रियेनंतर राजेशने दोन्ही गुडघ्यांमध्ये पूर्ण हालचाल क्षमता मिळवली. अपघातानंतर उभाही होऊ न शकणारा राजेश आता सायकल चालवतो. त्याने आपले शेतीचे कामही पुन्हा सुरू केले आहे.
डॉक्टरांच्या एकत्रित प्रयत्नांचे यश
रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी प्लास्टिक सर्जन, भूलतज्ज्ञ आणि फिजिओथेरपिस्ट यांच्या एकत्रित प्रयत्नांचे हे यश असल्याचे सांगितले. ते म्हणाले, लता मंगेशकर हॉस्पिटल येथे अशा गुंतागुंतीच्या पुनर्रचना शस्त्रक्रिया नियमितपणे आणि मोफत केल्या जातात.
Web Summary : A 24-year-old farmer, Rajesh, severely burned and paralyzed after an electrical shock, regained mobility thanks to reconstructive surgery. Doctors at Lata Mangeshkar Hospital successfully repaired his knees using tissues from other parts of his body, enabling him to cycle and resume farming.
Web Summary : बिजली के झटके से बुरी तरह झुलसे और अपंग हुए 24 वर्षीय किसान राजेश ने पुनर्निर्माण सर्जरी के बाद गतिशीलता हासिल की। लता मंगेशकर अस्पताल के डॉक्टरों ने शरीर के अन्य हिस्सों से ऊतकों का उपयोग करके सफलतापूर्वक उनके घुटनों की मरम्मत की, जिससे वह साइकिल चलाने और खेती फिर से शुरू करने में सक्षम हो गए।