शाळेचा पहिला ठोका : शाळांमध्ये प्रवेशोत्सवाचा उत्साहनागपूर : शाळेचा पहिला दिवस...शिक्षणाचा श्रीगणेशा...मुलांच्या मनात शाळेविषयीचे कुतूहल...औत्सुक्य आणि ओढही. पण नजर भिरभिरलेली...शाळेत जायचे आहे पण सोबत आई हवी. आईशिवाय शाळा ही कल्पनाही चिमुकल्यांना सहन न होणारी. पण आईचा हात सुटतो...मुल वेगळी होतात. शाळेतील बाई मुलांना ओढत, समजावत वर्गात घेऊन जाते पण मुलांचा आईसाठी आकांत सुरू राहतो. चिमुकल्याच्या प्रेमापोटी, त्याच्या काळजीपोटी आई शाळा सुटेपर्यंत घरीच जात नाही. शाळा ही संकल्पनाच माहीत नसलेल्या मुलांच्या आयुष्यात हळूहळू ही संकल्पना रुजणार. पण आज पहिलाच दिवस चिमुकल्यांच्या रडण्याने गाजला. शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुरड्यांची उडालेली धांदल ... सायकलरिक्षा, आॅटोरिक्षा यांची लगबग... त्यामुळे शाळेचा परिसर एकदम जिवंत झाला होता. डोळ्यात पाणी आणि शेंबूड पुसत-पुसत रडकी पोरं एकत्र आली. ओळखीचे चेहरे बघून काहींना धीर आला. पोरांना रडताना पाहून शिक्षकांचीही तारांबळ उडाली. वर्गात आल्यावर तीन-चार शिक्षक चिमुकल्यांना सांभाळण्यासाठी त्यांना गाणे म्हणून दाखवत होते, गोष्टी सांगत होते. हळूहळू चिमुकली वर्गात स्थिरावत गेली. शाळेत कुणीतरी आपली काळजी घेतेय, आपल्यासाठी गाणे म्हणत आहे, हे पाहून मुलांनाही धीर आला. शिक्षकांनी प्रेमाने दिलेल्या फुलांनी आणि चॉकलेटच्या खाऊनेही बाकीचे काम केले. (प्रतिनिधी)पुस्तक, खाऊचे वाटपजिल्हा परिषद, महानगरपालिकांसोबत शहरातील बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे आकर्षक पद्धतीने स्वागत करण्यात आले. अ़नेक शाळांत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. याशिवाय कुठे चॉकलेट, कुठे मिठाई तर कुठे निरनिराळ्या प्रकारच्या खाऊचे शाळांतर्फे वाटप झाले.
‘अ, आ, ई ’चा श्रीगणेशा
By admin | Updated: June 27, 2014 00:34 IST