लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ७० हजार रुपयांत जिल्हा परिषदेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून दोन महिलांनी एका दांपत्याची फसवणूक केली. हा प्रकार उघड झाल्यानंतर लकडगंज पोलिसांनी सोमवारी दोघींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
उज्ज्वला शैले सोनटक्के (रा. रामगड रोड, कामठी) आणि भारती दाैलत सलामे अशी आरोपी महिलांची नावे आहेत. धनेंद्र हिरदेराम हनवत (वय ३५, मानेवाडा) हे त्यांची पत्नी सुनीता यांना नोकरी मिळावी म्हणून प्रयत्नशील होते. त्यांना आरोपी सोनटक्के हिने गाठले. सुनीता यांना जिल्हा परिषदेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्यासाठी २४ ऑक्टोबर २०२०ला सलामेच्या घरी ७० हजार रुपये घेतले. रक्कम घेतल्यानंतर आरोपी महिला बेपत्ता झाल्या. आपली फसवणूक करण्यात आल्याचे लक्षात आल्यामुळे हनवत यांनी लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपी महिलांचा शोध घेतला जात आहे.
----
अनेकांना गंडा
या महिलांची पोलिसांनी चाैकशी सुरू केली असता त्यांनी अशा प्रकारे अनेकांना गंडा घातल्याचे उघड झाले. पोलीस आरोपी महिलांची चाैकशी करीत आहेत.