आरटीओने केले परवान्यांचे निलंबन : रस्त्यावर दिसताच बस रोखण्याच्या सूचना नागपूर : अपघाताच्या घटना व तांत्रिक बिघाड टळून विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी स्कूल बसेसची फेरतपासणी करण्याचे परिवहन विभागाने आदेश दिले होते. याला मुदतवाढही देण्यात आली होती. परंतु त्यानंतरही तपासणीसाठी न आलेल्या व योग्य कारणे न दिलेल्या ६०९ स्कूल बसच्या परवान्यांचे निलंबन करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर ग्रामीणने घेतला आहे. या बसेसचे नंबर प्लेट क्रमांक व इतर माहिती मंगळवारी वाहतूक पोलिसांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. रस्त्यावर ही वाहने दिसताच अटकवून ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.स्कूल बसच्या फेरतपासणीसाठी कारणे दाखवा नोटीस बजावूनही ज्यांनी कारणे दिली नाहीत किंवा योग्य उत्तरे दिली नाही त्यांच्या स्कूल बसच्या परवान्यांचे निलंबन रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. -शरद जिचकार, प्रादेशिक परिवहन अधिकारीन्यायालयाचा आदेश व परिवहन विभागाच्या सूचनेनुसार शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी दरवर्षी करणे बंधनकारक केले आहे़ उन्हाळी सुट्यांच्या कालावधीत फेरतपासणी करण्याबाबत परिवहन विभागाने २७ एप्रिल २०१६ रोजी परिपत्रक काढले. त्यानुसार प्रत्येक आरटीओ व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात १ मे ५ जून या कालावधीत ही तपासणी बंधनकारक करण्यात आली. ६६९ बसेसची फेर तपासणीनागपूर : बसेसच्या तपासणीसाठी कोणतेही शुल्क न घेता मोटार वाहन निरीक्षकाद्वारे वाहनांची तपासणी केली जाणार होती. यात वाहनाचा रंग, स्कूलबसवर नावाची नोंद, शाळेचे नाव, बसच्या पायरीची नेमून दिलेली उंची या शिवाय धोक्याचे इशारे देणारी प्रकाश योजना, वेग नियंत्रक, दरवाजा उघडण्यासाठी हँडल, आपत्कालीन दरवाजा, चालकास आपत्कालीन परिस्थितीची माहिती होण्याकरिता सूचना मिळण्याची सोय अशा एकूण १५ ते २० नियमांची पूर्तता करणाऱ्या बसला फिटनेस प्रमाणपत्र दिले जाणार होते. परंतु सुरुवातीला मिळालेल्या अत्यल्प प्रतिसादानंतर १५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र, त्यानंतरही फारसा प्रतिसाद मिळाला नाही.नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयांतर्गत १२७८ स्कूल बसची नोंद आहे. यातील ६६९ बसेसची फेर तपासणी झाली. उर्वरित ६०९ बसेसला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. परंतु यातील काहींनी योग्य कारण न दिल्याने व काहींनी याला उत्तरच न दिल्याने या सर्व स्कूल बसच्या परवान्यांचे निलंबन करण्याचा निर्णय कार्यालयाने घेतला आहे. आरटीओच्या वायु पथकाला या बसेस जप्त करण्याचे आदेशही देण्यात आले आहे.
६०९ स्कूल बसला रेड सिग्नल
By admin | Updated: September 28, 2016 03:17 IST