केळवद : चाेरट्याने कर्मचारी झाेपेत असताना पेट्राेलपंपामधून ४८ हजार ८२८ रुपये किमतीचे ५०७.५२ लीटर डिझेल चाेरून नेले. ही घटना केळवद (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील छत्रापूर शिवारात नुकतीच घडली.
गुरमितसिंग चावला, रा. जरीपटका, नागपूर यांचा नागपूर-सावनेर-पांढुर्णा मार्गावरील छत्रापूर (ता. सावनेर) शिवारात पेट्राेलपंप आहे. पेट्राेलपंपावरील कर्मचारी तुषार देवमन घुगल हा मध्यरात्री गाढ झाेपेत असल्याचे पाहून चाेरट्याने मशीन सुरू केली. यात त्याने मशीनच्या एका भागाकडून २८३.३७ लीटर व दुसऱ्या भागाकडून २२४.१४ लीटर असे एकूण ५०७.५२ लीटर डिझेल चाेरून नेले. त्या डिझेलची एकूण किंमत ४८ हजार ८२८ रुपये असल्याचे गुरमितसिंग चावला यांनी पाेलिसांना सांगितले. ही बाब लक्षात येताच त्यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी केळवद पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार रामराव पवार करीत आहेत.