रामटेक : घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना ५ ब्रास रेती मोफत देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी रामटेकच्या तहसीलदारांना दिले आहेत. पण रामटेक तालुक्यात रेतीघाट नसल्याने एवढी रेती उपलब्ध कुठून करावी, हा पेच प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. रामटेक तालुक्यात सध्या १३५० घरकुल लाभार्थी आहेत. त्यांना ५ ब्रास रेती म्हणजे ५ ट्रॅक्टर रेतीची राॅयल्टी द्यावी लागेल. रामटेकमध्ये सूर नदी व काही नाले आहेत. त्यामध्ये सर्वांना पुरेल एवढी रेती उपलब्ध होऊ शकत नाही. शासनाच्या आदेशान्वये तालुक्यातच रेती उपलब्ध करून द्यायची आहे. त्यामुळे दुसऱ्या तालुक्याच्या घाटातील रेती देता येत नाही. घरकुले पूर्ण करायची असतील तर रेती लाभार्थ्यांना दुसरीकडून घ्यावी लागेल. त्यामुळे आर्थिक भुर्दंड त्यांच्यावर पडणार आहे. आदेश येऊन एक आठवडा झाला, पण रेतीसाठी रॉयल्टीकरता कुणी मागणी केली नाही. याबाबत रामटेक तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी सांगीतले की, आदेश आले आहेत. जर कुणी रेती राॅयल्टीकरिता मागणी केल्यास त्यांना ५ ब्रास रेती उपलब्ध करून दिल्या जाईल. त्यासाठी एक कर्मचारी नियुक्त केला जाईल. रेती उचलण्याची वेळ ठरविली जाईल. त्यानंतर त्याची रॉयल्टी संपेल. कुणी गैरमार्गाचा उपयोग करु नये यासाठी उपाययोजना करण्यात येईल. रेती कमी आहे. माती मिश्रित आहे. त्यामुळे बांधकाम मजबूत होणार नाही. लाभार्थ्यांची संख्या अधिक असल्याने सर्वांना रेती उपलब्ध होईल असे दिसत नाही. रेती जरी मोफत असली तरी लाभार्थ्यांना ती भाड्याने वाहन करुन आणावी लागणार आहे. गाडीचे भाडेही जास्त आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक भार सोसावा लागेल. तालुक्यात प्रधानमंत्री घरकुल योजना, रमाई घरकुल योजना व शबरी घरकुल योजना सुरू आहेत. लाभार्थ्यांना प्रथम बांधकाम करावे लागेल. त्यानंतर त्यांना तीन टप्प्यात धनादेश दिला जातो. केंद्राचा सहभाग असलेल्या योजनेचा निधी लवकर मिळतो. पण महाराष्ट्र शासनाचा निधी उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. ५ ब्रास रेती उपलब्ध करून देण्याचा शासनाचा निर्णय मात्र दिलासा देणारा असल्याची प्रतिक्रिया लाभार्थ्यांनी व्यक्त केली.
५ ब्रास रेती मोफत द्यायची कशी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:07 IST