१० वाघांच्या शिकारी : वन विभागाला धक्का नागपूर : देशभरात ‘वाघ वाचवा’ मोहीम राबविली जात असताना महाराष्ट्रात गत पाच वर्षांत ४४ वाघ व ३०४ बिबट्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार गत २००९ ते मार्च २०१४ पर्यंत २५ वाघांचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. शिवाय ९ वाघांचा अपघाती मृत्यू झाला असून, १० वाघांना शिकाऱ्यांनी ठार केले आहे. गतवर्षी बहेलिया शिकारी टोळ्यांनी विदर्भातील अनेक वाघांना टार्गेट करून त्यांची शिकार केल्याची माहिती पुढे आली होती. यानंतर वन विभागाने वर्षभर आरोपींचा पाठलाग करून, गत ७ जून २०१४ पर्यंत ४० ते ४५ संशयितांना ताब्यात घेतले होते. मात्र यानंतरही शिकाऱ्यांनी किती वाघ ठार केले, याची वन विभागाला माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे शेवटी राज्य सरकारने हस्तक्षेप करून, संपूर्ण शिकारी प्रकरण सीबीआयच्या हाती सोपविण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, गत पाच वर्षांत वाघांसोबतच शेकडो बिबट्यांचाही मृत्यू झाला आहे. यात २००९ ते मार्च २०१४ पर्यंत १३९ बिबट्यांचा नैसर्गिक व ९७ बिबट्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे, तसेच ६८ बिबट शिकाऱ्यांनी ठार केले आहेत. वन विभागाने वाघ व बिबट्यांच्या मृत्यूची ही संख्या लक्षात घेता, व्याघ्र प्रकल्पात स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स (एसटीपीएफ) तैनात केली आहे. जाणकारांच्या मते, व्याघ्र प्रकल्पासोबतच प्रादेशिक वन क्षेत्रातही अनेक वाघांचा अधिवास आहे. परंतु मनुष्यबळाच्या अभावामुळे त्यांची सुरक्षा व संवर्धनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.(प्रतिनिधी)
पाच वर्षांत ४४ वाघांचा मृत्यू
By admin | Updated: July 22, 2014 00:53 IST