लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऊर्जा विभागाच्या कृषी पंप वीज कनेक्शन धोरणामुळे जिल्ह्यातील १.०४ लाख शेतकरी लाभान्वित होऊ शकतात. या शेतकऱ्यांवर एकूण ६२५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. जर या शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला तर त्यांचे एका वर्षाचे जवळपास ३९६ कोटी रुपये माफ होऊ शकतात.
एकूण ६२५ कोटी रुपये थकबाकीचे व्याज, विलंब शुल्क आदींचे १६७ कोटी रुपये माफ होतील. उर्वरित ४५८ कोटी रुपयाचे अर्धे म्हणजे २२९ कोटी रुपये शेतकऱ्यांनी भरले तर उर्वरित २२९ कोटी माफ होतील. या प्रकारे शेतकऱ्यांचे एकूण ३९६ कोटी रुपये माफ होतील. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना एका वर्षाच्या आत पैसे भरावे लागतील. आतापर्यंत झालेल्या वसुलीचा विचार केला तर शेतकऱ्यांनी ६० लाख रुपये भरलेले आहेत. या धोरणाचा शुभारंभ गेल्या २६ जानेवारीपासून करण्यात आला. या अंतर्गत थकबाकी वसुलीसाठी मोहीम सुरू करण्यात आली. कृषी ग्राहकांना दिवसा वीज प्रदान करण्यासाठी सौर प्रकल्प साकार करण्यात येतील. यासाठी ऑनलाइन लॅन्ड बँक पोर्टल तयार करण्यात आला आहे.