लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : कामठी-नागपूर मार्गावरील कल्पतरू कॉलनीतील घरफोडी प्रकरणात कामठी (नवीन) पाेलिसांनी एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून कार, माेटारसायकल, राेख रक्कम व इतर साहित्य असा एकूण तीन लाख ४७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात आणखी दाेन अट्टल चाेरट्यांचा समावेश असल्याने त्यांचा शाेध सुरू असल्याची माहिती पाेलीस सूत्रांनी दिली.
अब्दुल कादिर अब्दुल जब्बार कुरेशी (वय ६३, रा. कल्पतरू काॅलनी, कामठी) हे १४ जुलै राेजी कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले हाेते. त्याच काळात त्यांच्या घरी चाेरी झाली. यात चाेरट्यांनी आठ घड्याळे, १,५०० रुपयांचे नाणे, तीन मोबाईल फोन, टॉर्च, एमएच-३६/पी-७३३४ क्रमांकाची माेटारसायकल व एमएच-४०/बीई-६४९४ क्रमांकाची कार असा एकूण तीन लाख ४७ हजार रुपयांचा ऐवज चाेरून नेला हाेता. या प्रकरणात पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला.
दरम्यान, प्रदीप ऊर्फ दादू देवधर ठाकूर हा त्याच्या कुटुंबीयांसह गुरुवारी (दि. २२) एमएच-४०/बीई-६४९४ क्रमांकाच्या कारने वाकी (ता. सावनेर) येथे गेल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. मात्र, पाेलीस मागावर असल्याचे लक्षात येताच त्याने पळ काढला. पाेलिसांनी कारमधील तीन महिला व एका मुलाची विचारपूस केली. मुलाने मात्र ती कार चाेरीची असल्याचे तसेच त्या चाेरीत ताे सहभागी असल्याचे सांगितल्याने पाेलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
प्रदीप ठाकूरच्या घराच्या झडतीदरम्यान कार, माेटारसायकल, माेबाईल फाेन, नाणे, टाॅर्च, आदी साहित्य जप्त केल्याची माहिती ठाणेदार विजय मालचे यांनी दिली. प्रदीप हा अट्टल चाेरटा असून, त्याच्यासह साथीदारास लवकरच अटक करण्यात येणार असल्याचा विश्वासही ठाणेदार मालचे यांनी व्यक्त केला.
ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक सुरेश कन्नाके, उपनिरीक्षक श्याम वारंगे, हेडकॉन्स्टेबल पप्पू यादव, प्रमोद वाघ, अनिल बाळराजे, मनोहर राऊत, मंगेश लांजेवार, राजेंद्र टाकळीकर, नीलेश यादव, ललित शेंडे, सुधीर कनोजिया, उपेंद्र यादव, संदीप गुप्ता, सुरेंद्र शेंडे, उपेंद्र आकोटकर यांच्या पथकाने केली.