नागपूर : महिलांसाठी राखीव असलेल्या कोचमधून प्रवास करणे रेल्वे अॅक्टनुसार गुन्हा आहे. परंतु तरीसुद्धा अनेक प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करून महिलांच्या कोचमध्ये बसून प्रवास करतात. मंगळवारी दक्षिण एक्स्प्रेसमध्ये महिलांच्या कोचमध्ये प्रवास करणाऱ्या ३३ प्रवाशांविरुद्ध कारवाई करण्यात आली.महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी रेल्वेगाड्यात त्यांच्यासाठी विशेष कोचची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. या कोचमध्ये केवळ महिला प्रवाशांनीच प्रवास करावा, असा रेल्वेचा नियम आहे. परंतु अनेकदा पुरुष प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करून थेट महिलांसाठी राखीव असलेल्या कोचमधून प्रवास करतात. मंगळवारी रेल्वे सुरक्षा दलाने अशा प्रवाशांविरुद्ध अभियान राबविले. अभियानात रेल्वेगाडी क्रमांक १२७२१ हैदराबाद-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेसमधील महिला कोचमध्ये प्रवास करणाऱ्या ३३ प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या विरुद्ध रेल्वे अॅक्ट १६२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना रेल्वे न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना प्रत्येकी ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रवाशांनी असुविधा टाळण्यासाठी महिला, अपंगांसाठी राखीव कोचमधून प्रवास करू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
महिला कोचमधील ३३ प्रवाशांना अटक
By admin | Updated: March 25, 2015 02:36 IST