जि.प.त झाला होता वाद : तर कशी होणार स्वच्छता मोहीम ?नागपूर : विरोधकांच्या विरोधाला न जुमानता अध्यक्षांनी ३२ लाख रुपयांच्या कचराकुंड्या परस्पर खरेदी केल्या होत्या. त्यामुळे विरोधकांनी कचराकुंडी खरेदीत अध्यक्षांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. जि.प.ची सर्वसाधारण सभाही कचराकुंडीमुळे वादग्रस्त ठरली होती. अशातही अध्यक्षांनी कचराकुंड्या खरेदी केल्या. मात्र या कचराकुंड्या अद्यापही उपयोगात आल्या नाही. पंचायत समित्यांमध्ये या कचराकुंड्या अडगळीत पडल्या आहेत. नागपूर जिल्हा परिषदेने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीच्या व्याजातून ३२ लाख रुपयांच्या कचराकुंड्या खरेदी केल्या होत्या. लोकसेवेच्या कामासाठी या निधीचे सर्व सदस्यांना समप्रमाणात वाटप व्हावे अशी सदस्यांची मागणी होती. परंतु अध्यक्षांनी कचराकुंडी खरेदीचा विषय सभेत चर्चेत न आणता, परस्पर कचराकुंडीची खरेदी केली होती. त्यामुळे विरोधकांनी अध्यक्षांना कचराकुंडीवरून चांगलेच धारेवर धरले होते. अध्यक्षांनी विरोधकांना न जुमानता कचराकुंडी खरेदीला परस्पर मंजुरी देऊन ३२ लाखाच्या कचराकुंड्या खरेदी केल्या होत्या. या कचराकुंड्या पंचायत समिती स्तरावरून ग्रामपंचायतींना वाटप करण्यात येणार होत्या. कचराकुंडीच्या खरेदीला जवळपास चार महिन्यांचा कालावधी लोटला आहे. परंतु अनेक पंचायत समितींमध्ये या कचराकुंड्या अद्यापही पडून आहे. पंचायत समितीच्या स्तरावरून या कचराकुंड्या ग्रामपंचायतीला वाटप झालेल्या नाही. यासंदर्भात जि.प.च्या अध्यक्ष निशा सावरकर यांना विचारणा केली असता त्या म्हणाल्या की प्रत्येक सदस्यांना पाच कचराकुंड्या देण्यात येणार होत्या. सदस्यांची तर त्यापेक्षाही अधिक कचराकुंड्यांची मागणी होती. तरीही कचराकुंड्या कशा काय पंचायत समितीत अद्यापही पडून आहे, याची दखल नक्कीच घेण्यात येईल. स्थायी समितीच्या बैठकीत याचा आढावा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
३२ लाखांच्या कचराकुंड्या अडगळीत
By admin | Updated: September 28, 2016 03:23 IST