आज ‘वर्ल्ड अल्झायमर डे': दर पाच वर्षांनी अल्झायमरची संख्या दुप्पटनागपूर : स्मृतिभ्रंश (अल्झायमर) हा आजार अनेकांच्या आयुष्याची संध्याकाळ काळीकुट्ट करीत असून म्हातारपण पोखरत आहे. संपूर्ण देशात लोकसंख्येच्या ३ टक्के म्हणजे ३७ लाख ज्येष्ठ नागरिक अल्झायमरने त्रस्त आहेत. २१ लाख स्त्रिया आणि १५ लाख पुरुष असे हे प्रमाण आहे. महाराष्ट्रही यात आघाडीवर असून आजघडीला सुमारे ३ लाख ६० हजार जण या रोगाने बाधित आहेत. सिल्व्हर इनिंग फाऊंडेशन आणि अल्झायमर अॅण्ड रिलेटेड डिसआॅर्डर सोसायटी आॅफ इंडिया (एआरडीएसआय) यांनी संयुक्तरीत्या ज्येष्ठांच्या केलेल्या पाहणीनुसार दर पाच वर्षांनी अल्झायमरग्रस्तांची संख्या दुप्पट होत असल्याचे आढळून आले आहे. महाराष्ट्रात २००६ मध्ये दोन लाख सात हजार ज्येष्ठ नागरिक अल्झायमरने त्रस्त होते. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार २०११ मध्ये सुमारे तीन लाख ६० हजार ज्येष्ठांना अल्झायमरने ग्रासले आहे. जगात दर सातव्या सेकंदाला एक याप्रमाणे ज्येष्ठांना अल्झायमरची लागण होते आहे. प्राप्त सर्वेक्षणानुसार या संस्थांनी भविष्यातील या आजाराचा धोकाही अहवालात वर्तविला आहे. येत्या काही वर्षांत आजाराची सर्वाधिक म्हणजे २०० टक्के लागण दिल्ली, झारखंड आणि दिल्ली राज्यांमध्ये होण्याची शक्यता वर्तविली आहे. याशिवाय महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, आसाम आदी राज्यांतील अल्झायमरग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
अल्झायमरचे ३ लाख ६० हजारावर रुग्ण
By admin | Updated: September 21, 2015 03:22 IST