लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी/सावनेर : पारशिवनी पाेलिसांनी साहाेली शिवारात तर खापा (ता. सावनेर) पाेलिसांनी काेदेगाव शिवारात केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विनाराॅयल्टी वाहतूक करणारा प्रत्येकी असे दाेन ट्रक पकडले. या दाेन्ही कारवाईमध्ये २९ लाख रुपयांचे दाेन ट्रक आणि २३ हजार रुपयांची रेती असा एकूण २९ लाख २३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. शिवाय, दाेन्ही ट्रकचालकांना अटक केली.
पारशिवनी पाेलिसांचे पथक गुरुवारी (दि. १५) रात्री गस्तीवर असताना त्यांना साहाेली (ता. पारशिवनी) शिवारातून रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे या पथकाने पाहणी केली असता, त्यांना कन्हान नदीच्या पात्रातून एमएच-३१/एपी-७२०५ क्रमांकाचा ट्रक येताना दिसला. पाेलिसांनी या ट्रकची झडती घेतली असता त्यात रेती आढळून आली. ती रेतीची विनाराॅयल्टी वाहतूक असल्याचे कागदपत्रांच्या तपासणीत स्पष्ट हाेताच पाेलिसांनी ट्रकचालक बाळकृष्ण ऊर्फ नत्थू कुंभरे (३८, रा. साहाेली, ता. पारशिवनी) यास अटक केली. त्याच्याकडून चार लाख रुपयांचा ट्रक आणि आठ हजार रुपयांची दाेन ब्रास रेती असा एकूण चार लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती तपास अधिकारी तथा पाेलीस उपनिरीक्षक उबाळे यांनी दिली.
दरम्यान, खापा पाेलिसांनी काेदेगाव (ता. सावनेर) शिवारात शुक्रवारी (दि. १६) रात्री ८.३० वाजताच्या सुमारास गस्तीदरम्यान एमएच-३२/एजे-९६९६ क्रमांकाच्या ट्रकची झडती घेतली. त्या ट्रकमध्ये कन्हान नदीतील रेती आढळून आल्याने कागदपत्रांची तपासणी केली. ती रेती विनाराॅयल्टी असल्याचे स्पष्ट हाेताच पाेलिसांनी ट्रकचालक रामकृष्ण पांडुरंग भांडेकर (२८, रा. कारंजा घाडगे, जिल्हा वर्धा) यास अटक केली. शिवाय, ट्रकमालक माेहम्मद आरीफ रफीक शेख (२९, रा. कारंजा घाडगे, जिल्हा वर्धा) याच्याविरुद्ध गुन्हा नाेंदविला. त्याच्याकडून २५ लाख रुपयांचा ट्रक आणि १५ हजार रुपये किमतीचा पाच ब्रास रेती असा एकूण २५ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती तपास अधिकारी तथा ठाणेदार अजय मानकर यांनी दिली. या दाेन्ही प्रकरणात पारशिवनी व खापा पाेलिसांनी अनुक्रमे भादंवि ३७९, १०९, ३४ गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.