सहा महिन्यांची प्रतीक्षा संपली : मंत्र्यांचे विधान परिषदेत उत्तरयवतमाळ : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (एक्साईज) अधीक्षक व उपअधीक्षकांना अखेर शासनाने नियुक्त्या दिल्या असून त्यांचे सहा महिन्यांपेक्षा अधिक काळाचे थकीत वेतन देण्याचे आदेशही जारी केले आहेत. ‘लोकमत’ वृत्ताची दखल घेऊन विधान परिषद सदस्य धनंजय मुंडे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना उत्पादन शुल्क मंत्री गणेश नाईक यांनी उपरोक्त माहिती दिली. राज्य लोकसेवा आयोगामार्फत उत्पादन शुल्क खात्यात २९ अधीक्षक व उपअधीक्षक दाखल झाले होते. त्यांचा परिविक्षाधीन कार्यकाळ सप्टेंबर २०१३ मध्ये संपला. मात्र त्यानंतरही तब्बल सहा महिने त्यांना पूर्णवेळ नियुक्त्या दिल्या गेल्या नाही. हेतुपुरस्सर प्रतीक्षा यादीत ठेवले गेले. कायम नियुक्त्या न मिळाल्याने सहा महिने त्यांना वेतनही दिले गेले नाही. पर्यायाने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. सातारा जिल्ह्याच्या फलटन येथील अमर काटे या उपअधीक्षकाचा वेतनाच्या प्रतीक्षेत वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी १४ जानेवारी २०१४ रोजी हृदयाघाताने मृत्यू झाला. उत्पादन शुल्क खात्याच्या एसपींची व्यथा मांडणारे वृत्त ‘लोकमत’ने ८ मार्च २०१२ रोजी प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत आमदार धनंजय मुंडे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. सभागृहात कार्यपूर्तीचे उत्तर देता यावे म्हणून त्यापूर्वीच एक्साईजच्या अधीक्षक, उपअधीक्षकांना कायम नियुक्त्या दिल्या गेल्या.शिवाय उत्पादन शुल्क आयुक्तांना थकीत वेतन देण्याचे आदेश जारी करण्यात आले. यावर ‘लोकमत’मुळे न्याय मिळाल्याची भावना अनेक एसपींनी व्यक्त केली. (जिल्हा प्रतिनिधी)
२९ एक्साईज एसपींना नियुक्त्या
By admin | Updated: June 16, 2014 01:04 IST