लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शनिवारी तीन वेगवेगळ्या भागात अवैध दारू तस्करी करणाऱ्या ५ आरोपींना अटक केली. त्यांच्याजवळून २८८ लीटर मोहाची दारू जप्त करण्यात आली. आरोपीकडून दोन दुचाकी व कारही जप्त करण्यात आली. राकेश पंजाबराव बोरकर, विजय पुरणलाल बेलवंशी, रितेश अजय सोंबकुवर, पवन पुरुषोत्तम मोटघरे, साजीद अयूब खान अशी आरोपींची नावे आहे.
शनिवारी सकाळी एक्साईजचे निरीक्षक सुभाष खरे यांना कुही, इमामवाडा आणि गणेशपेठ परिसरात दुचाकी व एका कारने अवैध मोहाची दारू मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर खरे यांनी तिन्ही ठिकाणी वेगवेगळे पथक पाळत ठेवण्यासाठी तैनात केले. इमामवाडा येथे एमएच-१९-क्यू-४३८८ ची तपासणी केली असता त्यात ट्रकचे ट्यूब आणि प्लॅस्टिक पिशवीमध्ये मोहाची दारू सापडली. त्याच प्रकारे गणेशपेठ व कुही रोडवर दोन दुचाकीतून प्लॅस्टिक पिशवीतून दारू जप्त करण्यात आली. सर्व आरोपींना ताब्यात घेऊन मुंबई दारुबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक सुभाष खरे, दुय्यम निरीक्षक अशोक शितोले, प्रवीण मोहत्कर, विनोद भोयर व पथकाने केली.