केळवद : पाेलिसांनी नागपूर-पांढुर्णा मार्गावरील सावळी फाटा व बिहाडीफाटा परिसरात केलेल्या कारवाईमध्ये गुरांची अवैध वाहतूक करणारा कंटेनर पकडला. त्याचा कंटेनर मालक व चालकाविरुद्ध गुन्हा नाेंदविण्यात आला असून, एकूण २८ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी (दि. ९) रात्री ९ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
केळवद पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना मध्य प्रदेशातून नागपूरच्या दिशेने गुरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी वाहनाचा शाेध घ्यायला सुरुवात केली. पाेलीस मागावर असल्याची कुणकुण लागताच आरजे-०९/जीए-१९७२ क्रमांकाच्या कंटेनर चालकाने कंटेनर सावळी फाटा ते बिहाडा फाटा दरम्यान उभा केला आणि कंटेनर साेडून पळ काढला. पाेलिसांनी या कंटेनरची झडती घेतली असता, त्यात त्यांना ५९ बैल काेंबले असल्याचे निदर्शनास आले. त्या गुरांची विना परवानगी वाहतूक असल्याचे स्पष्ट हाेताच पाेलिसांनी वाहनासह गुरे ताब्यात घेतली. या कारवाईमध्ये २० लाख रुपयांचा कंटेनर आणि ८ लाख ५ हजार रुपये किमतीची जनावरे असा एकूण २८ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पाेलिसांनी दिली असून, सर्व जनावरांना नजीकच्या गाेरक्षणमध्ये पाठविण्यात आल्याचेही स्पष्ट केले. याप्रकरणी केळवद (ता. सावनेर) पाेलिसांनी कंटेनर मालक व चालकाविरुद्ध गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक पंकज वाघाेडे करीत आहेत.